पदवीधर, शिक्षकांसाठी खुशखबर; जुलैपर्यंत करता येणार मतदारनोंदणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर दोन प्रतिनिधी जुलै 2020 मध्ये निवडले जाणार आहेत. त्यासाठी सध्या मतदारनोंदणी केली जात आहे. मतदार नोंदणीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे राजकीय पक्ष, संघटनांच्या प्रतिनिधींकडे केली होती.
 

पुणे : पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदारनोंदणी करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर असली तरी, अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर पुन्हा जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत मतदारनोंदणी करता येणार आहे, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.

पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर दोन प्रतिनिधी जुलै 2020 मध्ये निवडले जाणार आहेत. त्यासाठी सध्या मतदारनोंदणी केली जात आहे. मतदारनोंदणीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे राजकीय पक्ष, संघटनांच्या प्रतिनिधींकडे केली होती.

म्हैसेकर म्हणाले, निवडणुक आयोगाने निश्‍चित केलेले वेळापत्रक बदलता येणार नाही. 6 नोव्हेंबर पर्यंत मतदारनोंदणी केल्यानंतर 19 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाईल. तीन ते नऊ डिसेंबर या कालावधीत त्यावर हरकती सुचना स्विकारल्या जातील व त्यावर 26 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. त्यांतर 30 डिसेंबरला पदवीधर व शिक्षक या दोन्ही मतदारसंघाची अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. या दोन्ही जागांसाठी जुलै महिन्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे 6 नोव्हेंबर पर्यंत ज्यांना मतदारनोंदणी करता आलेली नाही, त्यांना जानेवारी ते जुलै महिन्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या 10 दिवस आधी पर्यंत नवीन मतदारनोंदणी करता येणे शक्‍य आहे.

हे करू शकणार मतदारनोंदणी
पदवीधर विधान परिषद मतदारसंघाचे मतदार बनण्यासाठी 1 नोव्हेंबर 2016 पूर्वी पदवीधर असणे आवश्‍यक आहे. पदविधर साठी फॉर्म क्रमांक 18 भरणे आवश्‍यक आहे. तर शिक्षक मतदारसंघासाठी 1 नोव्हेंबर 2013 ते 1 नोव्हेंबर 2019 या कालावधीत कोणत्याही संस्थेत किमान तीन वर्ष शिक्षकाची नोकरी केलेली असणे अनिवार्य आहे. यासाठी फॉर्म क्रमांक 19 भरावा लागतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voter registration will be made available to graduates and teachers by July