पुण्यात कमळ फुलले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

निवडणुकीचे निकाल जसजसे जाहीर होत होते, तसतसे भाजपच्या उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला, उत्साहाने ते घोषणा देऊ लागले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची स्थिती मात्र त्याच्या उलट होती.

पुणे - सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा जबरदस्त धक्का देत भारतीय जनता पक्षाने पुणे महापालिकेमध्ये कमळ फुलविले. भारतीय जनता पक्षाने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गड उद्‌ध्वस्त करण्याच्या दिशेने जोरदार आगेकूच केली आहे. अर्थात, भाजपला सत्तेवर येण्यासाठी युतीतील शिवसेना या पारंपरिक मित्राची गरज लागेल का, एवढाच प्रश्‍न बाकी होता. मात्र याबाबतचे अधिकृत चित्र संपूर्ण मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ आणि मुरब्बी नगरसेवकांना पराभवाची चव भाजपच्या अनेक नवख्या आणि आतापर्यंत फारशी माहिती नसलेल्या भाजपच्या उमेदवारांनी चाखायला लावली.एकूण ४१ प्रभागांतील १६२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीतील मतमोजणी पुण्यात सकाळी अकरा मतमोजणी केंद्रांवर सुरू झाली आणि पहिल्या दीड ते दोन तासांतच जवळपास निम्म्या जागांचे कल स्पष्ट झाले. त्या निम्म्या जागांपैकी जवळपास निम्म्या जागा भाजपने पटकावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसची पीछेहाट झाली असून, एकेकाळचा सत्ताधारी काँग्रेस दोन आकडी संख्या गाठण्यासाठीही धडपड करीत असल्याचे चित्र होते. शिवसेनेने मात्र काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळविण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली.

केंद्रांवर सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार होती. मात्र त्याआधीपासूनच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तिथे गर्दी करण्यास सुरवात केली. सर्वच ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या निकालाचा मान रामटेकडी-सय्यदनगर या प्रभाग क्रमांक २४ ने मिळविला. या प्रभागातील क या खुल्या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंदा आलकुंटे यांनी भारतीय जनता पक्षाच्या इम्तियाज मोमीन यांच्यावर विजय मिळविला. त्या प्रभागात केवळ दोनच उमेदवार असल्याने त्या प्रभागाची मतमोजणी लवकर आटोपली. राष्ट्रवादी काँग्रेसने आलकुंटे यांच्या रूपाने खाते उघडले तरी त्यानंतर मात्र भाजपने पुण्याच्या सर्वच भागांत आघाडी घेण्यास सुरवात केली आणि पहिल्या दोन तासांनंतर जवळपास निम्म्या जागांचे कल जाहीर झाले. त्यानुसार भाजपने त्यातील निम्म्या जागी आघाडी घेतली. त्यानंतरच्या टप्प्यातही भाजपने आपली ही आगेकूच कायमच ठेवल्याचे दिसून आले. 

निवडणुकीचे निकाल जसजसे जाहीर होत होते, तसतसे भाजपच्या उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला, उत्साहाने ते घोषणा देऊ लागले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची स्थिती मात्र त्याच्या उलट होती. पहिल्या फेरीत मागे पडलेल्या उमेदवारांचे लक्ष त्या पुढच्या फेऱ्यांकडे जात होते. तथापि, त्या फेऱ्यांमध्येही ही पिछाडी कायमच राहिल्याने त्यांचे चेहरे हिरमुसले. पराभव स्पष्ट होत असताना त्यातील अनेक जणांनी मतमोजणी कक्ष सोडला.  

आधी मागे आणि नंतर पुढे...
काही प्रभागांतील उमेदवार आधी मागे पडल्याने त्यांच्या गोटात निराशा पसरत होती. मात्र त्यानंतर पुन्हा पुढच्या फेरीत आघाडी घेतल्याने पुन्हा त्या उमेदवारांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य येत होते, तसेच काही उमेदवारांनी आधी आघाडी घेतली, तर नंतर ते पिछाडीवर पडले.  

विकासाला मत - बापट
भाजपच्या उमेदवारनिश्‍चितीपासून ते प्रचारापर्यंतच्या सर्व टप्प्यांत महत्त्वाची भूमिका बजावलेले भाजपचे नेते गिरीश बापट यांनी पुणेकरांनी विकासाला मत दिले असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. बापट म्हणाले, ‘‘आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा आहे. आठ आमदारांसह दोन मंत्री, दोन खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी केलेले नियोजन उत्कृष्ट होते. स्पष्ट बहुमत मिळवू, अशी खात्री आम्हाला होती. आम्हाला विजयाकडे नेल्याबद्दल जनतेला धन्यवाद.’’

Web Title: #VoteTrendLive BJP wins Pune Municipal Corporation