#VoteTrendLive पुण्यात 'घड्याळ' बंद; कमळ फुलले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधून राष्ट्रवादीचे आनंद अलकुंटे, रुक्साना इनामदार व खंडू लोंढे विजयी झाले आहेत. सभागृह नेते बंडू केमसे यांच्यासह मनसेचे तीन नगरसेवक पराभूत झाले आहेत. केशवनगर साडेसतरा नळी येथून भाजपच्या वंदना कोद्रे विजयी झाल्या आहेत.

पुणे - पुणे महानगर पालिकेत भारतीय जनता पक्ष (भाजप) तर पिंपरी-चिंचडवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. 

पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधून राष्ट्रवादीचे आनंद अलकुंटे, रुक्साना इनामदार व खंडू लोंढे विजयी झाले आहेत. सभागृह नेते बंडू केमसे यांच्यासह मनसेचे तीन नगरसेवक पराभूत झाले आहेत. केशवनगर साडेसतरा नळी येथून भाजपच्या वंदना कोद्रे विजयी झाल्या आहेत. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप विजयी झाले आहेत. प्रभाग 15 मधील 
भाजपचे चार उमेदवार विजयी झाले असून, संपूर्ण पॅनेलला मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. अपक्ष उमेदवार रेश्मा भोसले विजयी झाल्या असून, त्यांनी महापौरपदासाठी दावा केला आहे.

पुण्याच्या महापालिकेत भाजपने सर्वस्व पणाला लावल्याचे फळ त्यांना मिळताना दिसत आहे. भाजपने वर्चस्व घेतले असून, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिल्याचे चित्र आहे. पुण्याचा नवा कारभारी कोण? याचा फैसला आजच्या (ता. 23) मतमोजणीमध्ये होत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण निकालाचे चित्र स्पष्ट होईल. महापालिकेतील 162 जागांसाठी 55.50 टक्के मतदान झाले होते. त्यात सुमारे एक हजार 107 उमेदवारांचे भवितव्य इलेट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) बंद झाले होते. महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान साडेचार टक्‍क्‍यांनी वाढली होती. 

गेली 15 वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीकडे महापालिकेची सत्ता आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तसेच नुकत्याच झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही असेच यश मिळण्याची भाजपला अपेक्षा आहे. पुणे महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी भाजपने यंदा शर्थीने प्रयत्न केले आहेत. प्रचारासाठी केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांच्यासह अनेक मंत्री; तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी शहरात आले होते. तर, सत्ता राखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आदी नेत्यांनी शहरात तळ ठोकला होता. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांशिवाय शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही शहरात दौरा केला होता. मतदानोत्तर व्यक्त करण्यात आलेले कौल पुण्यात कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने नसल्याने सत्ता कोणाकडे जाणार याबाबत उत्कंठा आहे. आता भाजपने वर्चस्व राखल्याने राष्ट्रवादीला फटका बसल्याचे दिसत आहे.

दुपारी एक वाजेपर्यंतची आकडेवारी-
पुणे -

शिवसेना- 8
भाजप- 48
काँग्रेस- 10
राष्ट्रवादी- 23
मनसे - 6
इतर- 5

पिंपरी-चिंचवड -
शिवसेना- 6
भाजप- 19
काँग्रेस- 0
राष्ट्रवादी- 20
मनसे - 0
इतर- 1

Web Title: votetrendlive pune municipal corporation ncp trailing