याद्यांतील चुकांमुळे गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

पुणे - स्लिपांचा गोंधळ, परिणामी मतदारांची होणारी धावपळ, मतदार यादीतील चुकांमुळे उमेदवारांची वाढलेली धाकधूक आणि अखेरच्या क्षणापर्यंत मतदान केंद्रावर लागलेल्या रांगा...अशा वातावरणात औंध, बोपोडी, बाणेर, बालेवाडी, पाषाण भागातील मतदार "राजा'ने मतदानाचा हक्क बजावला. कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादी झाल्याने काही मतदान केंद्रांवर काही काळ तणावाचे वातावरण होते.

पुणे - स्लिपांचा गोंधळ, परिणामी मतदारांची होणारी धावपळ, मतदार यादीतील चुकांमुळे उमेदवारांची वाढलेली धाकधूक आणि अखेरच्या क्षणापर्यंत मतदान केंद्रावर लागलेल्या रांगा...अशा वातावरणात औंध, बोपोडी, बाणेर, बालेवाडी, पाषाण भागातील मतदार "राजा'ने मतदानाचा हक्क बजावला. कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादी झाल्याने काही मतदान केंद्रांवर काही काळ तणावाचे वातावरण होते.

औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 8 (औंध-बोपोडी) आणि प्रभाग क्रमांक 9 (बाणेर-बालेवाडी-पाषाण) या दोन्ही प्रभागात सुरवातीच्या दोन तासांत 12 टक्के मतदान झाले. मतदान करण्यासाठी नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती सकाळीच घराबाहेर पडल्याचे दिसून आले. स्लिपांमधील चुका, मतदारयादीत नाव नसणे, मतदान केंद्राचा चुकीचा पत्ता अशा समस्या प्रकर्षाने जाणवल्या. मतदारांना काही दिवसांपूर्वीच पक्षांनी स्लिपांचे वाटप केले होते. मात्र, त्यातील काही स्लिपांवरील क्रमांक हे जुन्या प्रभाग रचनेनुसार असल्याने मतदारांचा गोंधळ उडाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जागोजागी छोटेखानी "मदत कक्ष' सुरू केले होते. सुरवातीला मोजक्‍याच ठिकाणी असलेले या कक्षांची संख्या गोंधळ वाढल्याचे लक्षात आल्यावर वाढविण्यात आली. कालपर्यंत "राजा' असलेल्या मतदाराला त्याचा हक्क बजावण्यासाठी नाहक धावपळ करावी लागली.

टेक्‍नोसॅव्ही मतदारांनी मोबाईलवरील डिजिटल स्लिप दाखवून मतदानाचा हक्क बजावला. एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर फेऱ्या माराव्या लागल्याने ज्येष्ठ नागरिक हैराण झाले होते, तरीही मतदानाचा उत्साह कायम होता. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक 8 मध्ये 23.11 टक्के, तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये 36.29 टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदारांची संख्या वाढू लागली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक 8 मध्ये 32.16 टक्के आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये 46.27 टक्के मतदारांनी मतदान केले. काही मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादीच्या घटना घडल्या; मात्र, पोलिसांनी तातडीने दखल घेतल्याने वातावरण शांत झाले.
गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांच्या नावाच्या याद्या मतदान केंद्राबाहेर दर्शनी भागात लावल्या होत्या. या याद्यांकडे पाहत, "अरे, प्रभागातील जवळपास सगळेच उमेदवार गुन्हेगार आहेत, मग आपण मत कोणाला द्यायचे?' अशी कुजबूजही मतदारांमध्ये सुरू होती; तर काही जण "अरे, आपल्या भागात एकही उच्चशिक्षित उमेदवार नाही', असे म्हणत नाराजी व्यक्त करत होते.

Web Title: voting list confussion