मतदारराजा वेळीच हो जागा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

आज जाहीर होणार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी; १७ जानेवारीपर्यंत नोंदवा हरकती

पुणे - महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारपासून (ता.१२) प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असून, त्यावर १७ जानेवारीपर्यंत हरकती-सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यावर सुनावणी झाल्यानंतर २१ जानेवारीला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यामुळे मतदार यादीत आपले नाव आहे का, त्यात कोणता बदल झाला आहे का? कोणत्या यादीत आणि प्रभागात आपले नाव आहे, हे मतदारांना तपासावे लागणार आहे. वेळीच या गोष्टी पाहिल्या, तर मतदानापासून वंचित राहावे लागणार नाही.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादीचा आधार घेऊन महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले. त्यानुसार गेल्या आठवड्यात प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये निवडणूक आयोगाने प्रसिद्ध विधानसभा मतदारसंघाचे विभाजन करून ही यादी तयार करण्यात येत आहे. तसेच, १ जानेवारी २०१७ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या तरुण-तरुणींचाही प्रभागनिहाय मतदार यादीत समावेश करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती, महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी दिली. 

ते म्हणाले, ‘‘प्रभागनिहाय जाहीर करण्यात येणाऱ्या मतदार यादीवर १२ ते १७ जानेवारी या कालावधीत हरकती-सूचना मागविण्यात येतील. त्यानंतर २१ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मतदार यादीत त्रुटी राहणार नाहीत, याची काळजी घेण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर तयारी केली जाईल.’’  

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नव्या यादीनुसार मतदान केंद्र ठरविण्यात येईल. त्यानंतर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाईल. प्रत्येक आठशे मतदारांमागे एका मतदान केंद्राची व्यवस्था असेल. पुढील आठवडाभरात त्याचे नियोजन करण्यात येईल. 
- सतीश कुलकर्णी, निवडणूक निर्णय अधिकारी 
 
फलकांवरील कारवाईची मोहीम
शहरात उभारलेले बेकायदा फलक काढण्याची महापालिका प्रशासनाची मोहीम सुरूच असून, गेल्या तीन दिवसांत सुमारे आठ हजार फलक, बॅनर आणि झेंडे उतरविण्यात आले आहेत. या पुढील काळात फलकांवरील कारवाईची मोहीम नियमित राबविण्यात येणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर नियोजन केल्याचे महापालिकेचे उपायुक्त विजय दहिभाते यांनी सांगितले. 

Web Title: voting list declare today