Gram Panchayats Election : राज्यातील पावणेआठ हजार ग्रामपंचायतींसाठी आज मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Voting today for eight thousand gram panchayats Election Sarpanch directly from people politics pune

Gram Panchayats Election : राज्यातील पावणेआठ हजार ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

पुणे : राज्यातील सात हजार ७७१ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या रविवारी(ता.१८) मतदान होत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून थेट जनतेतून सरपंचांची निवड केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी नक्षलग्रस्त जिल्हे वगळून अन्य सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन या वेळेत मतदान होणार आहे. दरम्यान, येत्या मंगळवारी (ता.२०) मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मतमोजणी ही आपापल्या ग्रामपंचायतीच्या तालुक्याच्या ठिकाणी केली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील आक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर केला होता. या कार्यक्रमातील पूर्वनियोजनानुसार उद्या हे मतदान घेण्यात येत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये पुरंदर तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित १२ तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील २२१ पैकी २७ ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निकालाची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये नगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नांदेड, नाशिक या ३४ जिल्ह्यांमधील ३४० तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होत आहे.