पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी उद्या मतदान 

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी उद्या मतदान 

पुणे : विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रांवर आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असून उद्या (मंगळवारी) सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. 

पदवीधर मतदारसंघासाठी पुणे विभागातील पाचही जिल्हे मिळून एकूण 4 लाख 32 हजार मतदार आहे. तर शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी 74 हजार 860 इतके मतदार आहेत. तर पुणे विभागात मिळून एकूण 1 हजार 202 मतदान केंद्र आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी प्रमुख पक्षांसह एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दि. 3 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. 
पसंतीक्रम आकड्यामध्ये लिहावा पदवीधर मतदार संघासाठी पांढऱ्या रंगाची, शिक्षक मतदार संघासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका असणार आहे. मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर चिन्ह छापलेली नसतात. मतपत्रिकेतील नावांसमोरील जागेत मतपत्रिकेत मतदार पसंती क्रमांक अंकात 1 पासून लिहावयाचा असून ते आकडे मराठी, इंग्रजी, रोमन किंवा भारतीय घटनेतील आठव्या अनुसूचीमध्ये दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेतील अंकात लिहिण्यास मुभा आहे, परंतु ते शब्दात लिहिता येणार नाहीत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यंदा नोटा पर्याय नाही..मतदारास मतपत्रिकेवर मतदान केंद्रावर उपलब्ध केलेल्या जांभळया स्केच पेननेच पसंती क्रमांक लिहावयाचा असतो. त्यामुळे बाण फुलीचा शिक्का दिलेला नसून मतदारांना जांभळा स्केचपेन देवून मत नोंदविण्याची कार्यवाही पूर्ण करुन घेतली जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या 11 सप्टेंबर 2018 च्या आदेशानुसार राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतपत्रिकेवरील नोटा हा पर्याय वगळण्यात आला आहे. गेल्या वेळच्या निवडणूकीत हा पर्याय होता. यंदा मात्र तो पर्याय ठेवण्यात आलेला नाही. 

मतदानासाठी हे ग्राह्य धरणार... 
या निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करू न शकणाऱ्या मतदारांचे आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड तसेच पारपत्र आदींसह नऊ कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपयोजना... 
सर्व मतदान केंद्र निर्जतुकीकरण करण्यात आली असून केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना हात स्वच्छ करण्यासाठी हॅण्डवॉश, पाणी व सॅनिटायझर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन मतदारांमधील सामाजिक अंतर 6 फुटांचे ठेवण्यात येणार आहे. एखाद्या मतदाराकडे मास्क नसल्यास त्या मास्क पुरविण्यात येणार आहे. मतदाराची थर्मल स्कॅनरच्या साहय्याने तापमान तपासले जाणार आहे. यामध्ये ठराविक निकषापेक्षा जास्त तापमान असल्यास दोनदा तपासणी केली जाणार आहे. जर मतदाराचे अधिक तापमान असल्यास संबधित मतदाराला टोकन देऊन त्यास शेवटच्या तासात मतदान करता येणार आहे. 

पदवीधर मतदारसंघ 
जिल्हा - पदवीधर मतदार- मतदान केंद्र - शिक्षक मतदार - मतदान केंद्र 
पुणे- 1,36,611 - 232 - 32,201 - 125 
सोलापूर - 53,813 - 132 - 13,584 -74 
सातारा- 59,071 - 143 - 7,711 - 44 
कोल्हापूर- 89,529 - 205 - 12,237 - 76 
सांगली- 87,551 -123 - 6,812 - 48 

पुणे जिल्ह्यात शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी अडीच हजार कर्मचाऱ्यांची नेमणुक करणात आली आहे. मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरिक्षक त्याचबरोबर दोन स्वतंत्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर आवश्‍यक तो पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. -डॉ.राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com