मास्क घालत नसाल तर सावधान, तुमच्यावर होईल दंडात्मक कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

अनलॉकच्या काळात आता घराबाहेर पडताना लोक पुरेशी काळजी घेत नसल्यानं आता अनेक ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 

वाघोली, ता.30 - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही लोक बेजबाबदारपणे वागत असल्याचं सध्या दिसून येत आहे. अनलॉकच्या काळात आता घराबाहेर पडताना लोक पुरेशी काळजी घेत नसल्यानं आता अनेक ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.  वाघोली परिसरामध्ये मास्क न वापरणाऱ्या पाच दुकानदारांसह 154 जणांवर वाघोली ग्रामपंचायत व लोणीकंद पोलीस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.  मागील तीन दिवसांपासून पोलीस व ग्रामपंचायतीचे कर्मचारी विना मास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. दुकानदारांकडून 500 रुपये तर नागरिकांकडून 100 रुपये प्रत्येकी दंड वसूल करण्यात आला आहे. वाघोलीतील दुकानदार व नागरिकांनी मास्क घातल्याशिवाय बाहेर फिरू नये अन्यथा दंडात्मक कारवाई होऊ शकते असे आवाहन प्रशासनाच्या करण्यात आले आहे.

खेड शिवापूरमधील कोरोनाबाधित संपर्कातील अकरा जणांचे अहवाल

भाजी विक्रेत्यांकडून हलगर्जी पणा
वाघोलीत भाजी विक्रेत्यांची संख्या भरपूर आहे. लॉकडाऊन मध्ये या संख्येत अजून वाढ झाली आहे. बहुतांश भाजी विक्रेते मास वापरण्याकडे दुर्लक्ष करतात. काही ग्राहकही विना मास्क त्यांच्याकडे खरेदीला जातात. याबाबत वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत मास्क वापराकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन केले आहे. ग्राहकांनी ही खरेदीला जाताना विना मास्क जाऊ नये तसेच दुकानदार अथवा भाजी विक्रेते याना मास्क घालण्याची विनंती करावी नंतरच खरेदी करावी. असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नागसेन लोखंडे यांनी केले आहे.    

कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर चा वापर करणे, गर्दी न करणे, गर्दीत जाणे टाळणे, सहा फुटाचे सोशल डिस्टनसिंग ठेवणे या बाबींचे काटेकोर पणे पालन केल्यास कोरोना आपणापासून दूर राहील. 
- डॉ वर्षा गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले असून आतापर्यंत 1 लाख 65 हजार इतकी संख्या झाली आहे. यापैकी 86 हजार 575 जण बरे होऊन परतले आहेत. तर 7429 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनामुळे मृतांची संख्या 16893 वर पोहोचली आहे. जगातील एक कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wagholi police and grampanchayat took action against people who without mask