प्रश्‍न पुण्याचे : वाघोलीतील कोंडी कधी फुटणार?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

शहराचे पश्‍चिमद्वार असलेल्या पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न १० वर्षांहून अधिक काळ सुटलेला नाही. येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाण पूल आणि प्रादेशिक आराखड्यातील रस्ता, असे अनेक पर्याय पुढे आले. त्यांना मंजुरीही मिळाली. परंतु, कागदपत्रांशिवाय कोणतीही प्रगती झाली नाही. त्यामुळे ही वाहतूक कोंडी फुटणार कधी, असा प्रश्‍न येथील रहिवाशांसह वाहनचालकांना पडला आहे.

पुणे - शहराचे पश्‍चिमद्वार असलेल्या पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न १० वर्षांहून अधिक काळ सुटलेला नाही. येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाण पूल आणि प्रादेशिक आराखड्यातील रस्ता, असे अनेक पर्याय पुढे आले. त्यांना मंजुरीही मिळाली. परंतु, कागदपत्रांशिवाय कोणतीही प्रगती झाली नाही. त्यामुळे ही वाहतूक कोंडी फुटणार कधी, असा प्रश्‍न येथील रहिवाशांसह वाहनचालकांना पडला आहे.

पुणे ते औरंगाबाद यादरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण झाले. या रस्त्यावरील वाघोलीपासून येरवड्यापर्यंतच्या रस्त्याचेही रुंदीकरण झाले. मात्र, वाघोलीजवळील रस्त्याचे काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. 

वाघोलीजवळील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आतापर्यंत डझनभर घोषणा झाल्या. प्रत्यक्षात कासवापेक्षाही कमी गतीने त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या भागातून प्रवास करताना अनेकांना किमान दीड ते दोन तास कोंडीचा सामना करावा लागत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यासाठीचा निधीही पडून आहे. परंतु, गेल्या पाच वर्षांत या खात्याचे काम बंद पडल्यात जमा आहे. चार वर्षांपूर्वी पीएमआरडीएच्या हद्दीत वाघोली आणि परिसरातील गावांचा समावेश झाला. 

प्रादेशिक विकास आराखड्यात वाघोली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी २४ मीटर रुंदीच्या रस्त्याची आखणी करण्यात आली. हा रस्ता विकसित करावा, यासाठी पीएमआरडीएचे तत्कालीन अध्यक्ष आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी दोन ते तीन वेळा पाहणी केली. लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरवात होणार, अशी घोषणाही झाली. परंतु, अद्याप रस्त्यांची जागा ताब्यात आलेली नाही. 

तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनीही येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले. बैठका होतात, निर्णय घेतले जातात. मात्र, वाहतूक कोंडीचा प्रश्‍न काही सुटत नाही. हा पर्यायी रस्ता मार्गी लागला, तर वाघोलीतील कोंडी काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. हे माहिती असूनही पीएमआरडीएकडून प्राधान्याने या रस्त्याचे काम हाती घेतले जात नाही. पुढील पाच वर्षांत तरी ही कोंडी फुटणार का, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wagholi Traffic Issue