मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेस तीन वर्षांची प्रतीक्षा | Adopt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेस तीन वर्षांची प्रतीक्षा
मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेस तीन वर्षांची प्रतीक्षा

मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेस तीन वर्षांची प्रतीक्षा

पुणे - मूल दत्तक घेण्यासाठी शासनमान्य संस्थेत दाखल होत असलेल्या मुलांची संख्या कमी झाल्याने, तसेच आवश्‍यक असलेल्या प्रक्रियेस बराच वेळ लागत असल्याने बाळ दत्तक मिळण्यासाठी अडीच ते तीन वर्षांचे वेटिंग आहे. सध्या देशात केवळ दोन हजार बालके दत्तक देण्यासाठी उपलब्ध असून त्यांच्यासाठी तीस हजार पालक प्रतीक्षा यादीत आहेत.

पालकांनी आणून दिलेली बालके, सोडून दिलेली बालके आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेली अनेक बालके संस्थेत दाखल होत असतात. पालकांकडून आणून दिलेली आणि सोडून दिलेली मुले दाखल झाल्यानंतर त्यांना दत्तक देण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बाबींची पूर्तता झाल्यानंतरच त्यांना दत्तक देण्यात येते.

जन्मदात्या पालकांसाठी ६० दिवसांची मुदत

पालकांनी त्याग केलेल्या मुलांचा त्यांना परत ताबा घेण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी दिला जातो. त्या मुदतीत त्यांनी मुलावर दावा सांगितला नाही तर बालकल्याण समिती त्या मुलाला दत्तकासाठी मुक्त घोषित करते. मुलासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करून ती केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (Child Adoption Resource Information & Guidance System (CARINGS) या संकेतस्थळावर अपलोड केली जाते. या मार्फत बाळांची शिफारस मुल दत्तक घेण्यास इच्छुक पालकांना दिली जाते.

हेही वाचा: Khadakwasla : सततच्या पाणी गळतीमुळे रस्त्याची दुरवस्था

तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही

पोलिसांकडून दाखल झालेल्या बालकांच्या पाल्याचा शोध घेणे किंवा त्याला सोडून दिल्यानंतर जन्मादात्यांच्या शोधासाठी तपास सुरू होतो. सापडलेल्या दोन वर्षांपर्यंतच्या मुलांच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्याचा तपास दोन महिन्यात पूर्ण होणे आवश्यक आहे, तर दोन वर्षां पुढील वयाच्या मुलांचा तपास चार महिन्यात व्हायला पाहिजे असे कायद्यात नमूद आहे. मात्र या सर्व बाबींना जास्त दिवसांचा कालावधीही लागू शकतो. मुलांची माहिती व फोटो वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येते. मुलं मोठी असतील तर त्याचा फोटो आणि माहिती दूरदर्शनवरही प्रसिद्ध करावी लागते, अशी माहिती सोफोशकडून देण्यात आली.

अशी असते प्रक्रिया

मुलाची सर्व कायदेशीर कागदपत्रे जमा झाल्यानंतर ती बाल कल्याण समितीकडे सादर केली जातात. त्यानंतर ती जिल्हा बालसंरक्षक कक्षाकडे जातात. त्यांचा अहवाल बालकल्याण समितीकडे येतो त्यानंतर बालकल्याण समिती त्यावर निर्णय घेवून मुलाला दत्तक देण्यासाठी मुक्त घोषित करते. यानंतर संस्था त्या मुलाच्या दत्तकाच्या पुढील प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे तयार करून CARINGS पोर्टल वर अपलोड करते.

उशीर होण्याची कारणे

  • मुलांबाबत पोलिस तपासास उशीर होणे

  • त्याग केलेल्या मुलांचा ताबा घेण्यासाठी पालकांना संधी देणे

  • सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यास वेळ जातो

  • संस्थेत मूल दाखल होण्याचे प्रमाण व दत्तकेच्छुकांच्या यादीत तफावत

CARINGS म्हणजे काय

बाल दत्तक संसाधन माहिती आणि मार्गदर्शन प्रणाली (CARINGS) ही दत्तक देण्यासाठी नियमावली बनवणारी संस्था भारतात तसेच परदेशात मुलांना दत्तक देण्यासाठी नोडल बॉडी म्हणून कार्यरत आहे.

मूल दत्तक घेण्यासह त्याबाबतच्या सर्वमाहितीसाठी : www.cara.nic.in

loading image
go to top