Khadakwasla : सततच्या पाणी गळतीमुळे रस्त्याची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khadakwasla : सततच्या पाणी गळतीमुळे रस्त्याची दुरवस्था

Khadakwasla : सततच्या पाणी गळतीमुळे रस्त्याची दुरवस्था

किरकटवाडी : सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टाकीतून सतत पाणी गळती होत असल्याने खडकवासला धरण चौकात पुणे-पाणशेत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पाणी साचलेले असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सदर प्रकाराबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी पाणी गळती दुरुस्तीचे तर सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन 'सकाळ'शी बोलताना दिले आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रात चार दिवस पुन्हा पाऊस...हवामान विभागाचा इशारा

खडकवासला धरण चौकाजवळ खडकवासला गावच्या पिण्याच्या पाण्याची जुनी टाकी आहे. या टाकीतून सतत मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू असते. डोंगर उतारावरून या गळती झालेल्या पाण्याचा प्रवाह पुणे-पानशेत रस्त्यावर येतो. या पाण्यामुळे खडकवासला धरण चौक ते बापुजीबुवा मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे.

शनिवार-रविवार होते वाहतूक कोंडी

प्रत्येक शनिवार व रविवारी खडकवासला, सिंहगड, पानशेत या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. खडकवासला धरण चौकात रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दर शनिवार व रविवारी या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात.

हेही वाचा: कंगना रणौतची पद्मश्री रद्द करा; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याची मागणी

"सततच्या पाणी गळतीमुळे रस्ता अत्यंत खराब झाला आहे. दुचाकीवरून अनेक नागरिक याठिकाणी तोल जाऊन पडलेले आहेत.खड्डा चुकवण्याच्या नादात एखाद्याचा जीव जाईल."

- शंकर ठाणगे, नागरिक खडकवासला.

"दररोज या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. केवळ तात्पुरते खड्डे बुजवले जातात. दोन-तीन दिवसांत खड्डे 'जैसे थे' दिसतात. पाणी गळती बंद करुन रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे."

- सागर जागडे, नोकरदार, रुळे.

"पाणी गळतीची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करुन घेण्यात येईल."

- सचिन गावडे, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग‌‌‌, पुणे मनपा.

"अनेक वेळा येथील खड्डे बुजविण्यात आले परंतु पाण्याचा सतत प्रवाह असल्याने रस्ता खराब होतो. पुन्हा खड्डे बुजवून घेण्यात येतील व रस्त्याचे कामही करुन घेण्यात येत आहे."

- ज्ञानेश्वर राठोड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

loading image
go to top