रस्त्यावर वॉकिंग प्लाझाचा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

परिहार चौकातून गर्दीच्या वेळी सुमारे १९०० वाहने जातात, तर पोलिस लाइन रस्त्यावरून त्यापैकी फक्त ३० टक्के वाहने जातात. त्यामुळे परिहार चौकातून ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना पोलिस लाइन रस्त्याच्या एकेरी मार्गाने वळविण्यात आले आहे. 

पुणे - वेळ सकाळी साडेआठची... ठिकाण - औंध. 
लहान मुले ‘हेल्मेट’ घालून सायकल चालवत होते... ‘मॉर्निंग वॉक’ला आलेले मित्र आणि मैत्रिणी बाकड्यावर बसून गप्पा मारत होते... एरवी वाहनांची वर्दळ दिसणाऱ्या या रस्त्यावर सायकली आणि पायी फिरत असलेले तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक कसे दिसू लागले, याचे कुतूहल अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होते... उत्सुकतेपोटी चौकशी केंद्रावर जाऊन हा सगळा काय प्रकार आहे, याची माहिती घेणारे अनेक नागरिक कौतुकाने सगळीकडे नजर फिरवत होते... 

‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत आणि पादचारी धोरणानुसार औंध परिसरातील डीपी रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी ‘वॉकिंग प्लाझा’ आणि ‘सायकल ट्रॅक’ प्रायोगिक तत्त्वावर आखण्यात आला आहे. त्यासाठी डीपी रस्त्याची एक बाजू वाहनांसाठी पूर्णतः बंद करण्यात आली आहे. केवळ ब्रेमन चौकाकडून परिहार चौकाकडे जाणारी बाजू वाहनांना वापरता येत असून, तेथेही पदपथाची रुंदी दुप्पट करण्यात येत आहे. दुप्पट रुंदीच्या या पदपथाशेजारील एक लेन मोटारी व दुचाकींच्या पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात वाहनांना फक्त एकच लेन वापरण्यासाठी उपलब्ध होत आहे. 

परिहार चौकातून गर्दीच्या वेळी सुमारे १९०० वाहने जातात, तर पोलिस लाइन रस्त्यावरून त्यापैकी फक्त ३० टक्के वाहने जातात. त्यामुळे परिहार चौकातून ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना पोलिस लाइन रस्त्याच्या एकेरी मार्गाने वळविण्यात आले आहे. 

संपूर्ण परिसरामध्ये ठिकठिकाणी नो-पार्किंगचे फलक, वेगमर्यादा ताशी २० किमी ठेवण्याबाबतचे सूचना फलक लावले आहेत, तसेच २२ ठिकाणी ‘उडाण’ नावाची आणि पाच मिनिटांच्या वारंवारितेची ‘शटल’ वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली आहे. 

गेल्या दोन दिवसांत म्हणजे शनिवारी आणि रविवारी विशेषतः सकाळी व सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांसह तरुण-तरुणींनी योजनेला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. चौकशी केंद्रावर आलेल्या नागरिकांना अभिप्रायाचे अर्ज भरण्यास सांगितले जात आहेत. 
- राहुल सोनवणे, महापालिका कर्मचारी

रस्त्यावर सार्वजनिक वाहतूक सेवा आणि पादचाऱ्यांचे राज्य असलेच पाहिजे. वाहनांना रस्त्यावरून बाजूला ठेवले जाईल, त्याचवेळी खरा बदल होईल. स्मार्ट सिटी योजनेविषयी साशंक असलेल्या लोकांनाही औंध रस्त्याच्या पुनर्रचनेचा आणि शटल सेवेने मोहात पाडले आहे.
- सिद्धेश भोबे, सॉफ्टवेअर प्रोफेशनल

पुनर्रचना करताना...

  • पादचाऱ्यांना प्राधान्य 
  • सलग, समपातळीचे आणि विनाअडथळा पदपथ 
  • सायकलस्वारांच्या दृष्टीने सुरक्षित रस्ते 
  • दिव्यांग व्यक्तींसाठी प्राधान्याने आणि सोयीची व्यवस्था 
  • स्थानिक पातळीवर बॅटरीवर चालणारी ‘शटल’ वाहतूक सेवा 
  • ‘पीएमपी’ या सार्वजनिक वाहतूक सेवेत सुधारणा 
  • वाहनांचे पार्किंग आणि विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागेचे नियोजन

औंध रस्ता - पुनर्रचना 

  • मार्ग १ -  ब्रेमन चौक - दीपक स्वीट्‌स-राधिका रेस्टॉरंट-कलमाडी हायस्कूल-ट्रान्स्पोर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट-पुन्हा ब्रेमन चौक 
  • मार्ग २ : परिहार चौक-आयटीआय-सर्जा हॉटेल चौक-क्रोमा-पंजाब नॅशनल बॅंक-आनंदबन क्‍लब- पेट्रोल पंप- डीएव्ही स्कूल चौक - वेस्टएन्ड - पुन्हा परिहार चौक 
  • मार्ग ३ - परिहार चौक-वेस्टएन्ड - डीएव्ही स्कूल चौक- विधाते वस्ती- मेडिपॉइंट हॉस्पिटल- भाले चौक - रिलायन्स मार्ट- पुन्हा परिहार चौक
Web Title: walking plaza experiment on road