शिवनेरीवरील भिंत कोसळली 

दत्ता म्हसकर
रविवार, 11 ऑगस्ट 2019

सतत कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे शिवनेरी किल्ल्यावरील सरकारवाड्याची भिंत कोसळली आहे.

 

जुन्नर (पुणे) : येथे गेले पंधरा दिवस सतत कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे शिवनेरी किल्ल्यावरील सरकारवाड्याची भिंत कोसळली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाजवळच हा प्राचीन वाडा आहे. तो किल्ले शिवनेरीवरील सरकारवाडा म्हणून ओळखला जातो. या वाड्यात एक स्वयंपाकघर, दोन मोठी दालने, कारंजे असलेली पाण्याची टाकी, न्हाणीघर यांचे अवशेष आढळतात. यापूर्वीदेखील येथे मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. त्यामुळे ही वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 

गेल्याच आठवड्यात गडावरील पहिल्या दरवाजाजवळील संरक्षक भिंत कोसळली होती. हत्ती दरवाजाशेजारील तटबंदीदेखील ढासळण्याच्या मार्गावर आहे. येथील दुरुस्तीबाबत शिवप्रेमी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. पुरातत्व खात्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या खात्याच्या कारभारावर शिवप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wall collapses at Shivneri fort