उमेदवारी हवी? होऊ द्या खर्च! 

उमेदवारी हवी? होऊ द्या खर्च! 

नेत्यांच्या जाहीर सभा, यात्रा, आंदोलने, वाढदिवस यासाठी तुम्ही किती ‘बॅनर’-‘फ्लेक्‍स’ लावता, नेत्याची बडदास्त कोणत्या पंचतारांकित हॉटेलमध्ये करता, कार्यकर्ते ‘गोळा’ करण्याची तुमची क्षमता किती आहे, कार्यकर्ते जपण्याची तुमची काही खास ‘स्टाइल’ आहे, आर्थिकदृष्ट्या तुम्ही एकदम ‘दिलदार’ आहात का? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे जर ‘हो’ असतील तर तुम्ही कोणतीही निवडणूक लढविण्यास एकदम पात्र आहात. गेल्या वीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहात, विषयांचा अभ्यास चांगला आहे, जनसंपर्क चांगला आहे, व्यवस्थेविरोधात लढण्याची क्षमता आहे; पण निवडणुकीचा खर्च मात्र पक्षाने करावा, अशी तुमची अपेक्षा असेल तर उगाच उमेदवारी मागण्याच्या फंदातही पडू नका. कारण, तुमची ‘निवडून येण्याची क्षमता’ या उमेदवारी मिळविण्याच्या मुख्य निकषांत बसतच नाही. शहरात सध्या कोणत्याही रस्त्यावर जा, गल्ली-बोळात फिरा, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या इच्छुकांच्या ‘सुबत्ते’चे दर्शन फ्लेक्‍सवर दिसून येते. 

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा दोन दिवस पुण्यात होती. या यात्रेचा ‘राज्य व केंद्र सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे’, हा ‘अजेंडा’ होता. यात्रेचा मुहूर्त साधत भडकलेले पेट्रोलचे दर आणि भरकटलेला ‘राम’ हे दोन मुद्दे अनायासे काँग्रेसच्या हातात मिळाले. यात्रेत काँग्रेसला आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या इच्छुकांच्या विविध ‘क्षमतांची’ चाचपणीही करता आली. पुण्यात कात्रजला यात्रेचा प्रारंभ झाला तेव्हापासून इच्छुकांची अनोखी चढाओढ पाहायला मिळाली. अगदी प्रदेशाध्यक्षांना एकांतात नेऊन मन मोकळे करण्यापासून ते अगदी कोणाचा फ्लेक्‍स मोठा आणि कोणी सर्वाधिक फ्लेक्‍स लावले, कोणी सर्वाधिक खर्च केला, याची गणिते मांडण्यात आली. पर्वतीत आबा बागूल-अभय छाजेड, कसब्यात रोहित टिळक-रवींद्र धंगेकर, शिवाजीनगरमध्ये दत्ता बहिरट-मनीष आनंद-दीप्ती चवधरी अशी जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात फ्लेक्‍सची चढाओढ पाहायला मिळाली. या सर्वांत सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता मात्र दुर्लक्षितच राहिला. पक्षाकडून आगामी निवडणुकीत ‘न्याय’ मिळेल, या भ्रामक कल्पनेत रमणारा हा उत्साही कार्यकर्ता हिरमुसला, हे नक्की. पुणेकर मतदाराला त्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मदत मिळण्याऐवजी  रॅलीमुळे झालेली वाहतूक कोंडी आणि ठिकठिकाणी लागलेल्या अनधिकृत फ्लेक्‍सचा त्रासच सोसावा लागला. जनसंघर्ष यात्रेमुळे काँग्रेसचे शहरातील नेते किमान कार्यरत तरी झाले, हेच या यात्रेचे यशच म्हणावे लागेल. 

व्यक्तिगत प्रदर्शनाच्या स्पर्धेत सत्ताधारी भाजपनेही आपण मागे नाही, हे दाखवून दिले. लोकसभेसाठी कोणत्याही पक्षाची उमेदवारी मिळविण्यास उत्सुक असणाऱ्या खासदार संजय काकडे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शहरभर फ्लेक्‍स लावून आणि विविध कार्यक्रम घेऊन पुणेकरांचे लक्ष वेधले. काकडेंच्या फ्लेक्‍सवरील कार्यकर्त्यांचे फोटो पाहून पुणेकरांना त्यांच्या जनसंपर्काचा आवाका लक्षात आला असेल. लोकसभेचे दुसरे इच्छुक पालकमंत्री गिरीश बापट यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या निधनामुळे वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर केले. त्यातून बापट आणि काकडे यांच्यातील फरक भाजपच्या चाणाक्ष कार्यकर्त्यांच्या नजरेतून सुटला नाही. संपत्तीचे प्रदर्शन केले, खर्च करण्याची ताकद दाखवून दिली की, राजकीय पक्ष उमेदवारी देतात, हा समज सध्या दृढ होत आहे. 

याला सर्वच राजकीय पक्षांनी वेळीच अटकाव घालावा; अन्यथा असे पक्ष केवळ फ्लेक्‍सपुरतेच उरतील, हे मात्र नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com