"पाकशी युद्ध हा पर्याय नाही; चर्चेने प्रश्‍न सोडवावेत"

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

 

पिंपरी : "भारत-पाकिस्तान यांच्यात ताणलेले संबंध पाहता पाकिस्तानशी युद्ध करणे हा पर्याय ठरू शकत नाही. वाटाघाटी करून चर्चेद्वारे प्रश्‍न सोडवायला हवेत. सर्जिकल स्ट्राईक अपवादात्मक परिस्थितीत ठीक आहे. पाकिस्तानला वेगळ्या पातळीवर आपण आपली शक्ती दाखवायला हवी'', असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी शनिवारी (ता.22) चिंचवडगाव येथे केले. 

 

पिंपरी : "भारत-पाकिस्तान यांच्यात ताणलेले संबंध पाहता पाकिस्तानशी युद्ध करणे हा पर्याय ठरू शकत नाही. वाटाघाटी करून चर्चेद्वारे प्रश्‍न सोडवायला हवेत. सर्जिकल स्ट्राईक अपवादात्मक परिस्थितीत ठीक आहे. पाकिस्तानला वेगळ्या पातळीवर आपण आपली शक्ती दाखवायला हवी'', असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी शनिवारी (ता.22) चिंचवडगाव येथे केले. 

येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरूकुलमला त्यांनी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर भेट दिली. वंचित घटकातील मुलांसाठी हे गुरूकुलम कार्यरत आहेत. कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मराठा आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले. 
गुरूकुलममधील संगणक कक्ष, प्रयोगशाळा, अभियांत्रिकी कार्यशाळा, धातुकाम, बांबुकाम, पॉटरी, आयुर्वेद, कृषी विभाग, ग्रंथालय, गृहविज्ञान विभाग, गोशाळा आदी विभागांची त्यांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांची विचारपूस केली. विद्यार्थ्यांना दिवाळी फराळासाठी 25 हजार रुपयांची देणगी देऊ केली. मुलांनी मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. 
पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह ऍड. सतीश गोरडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाह डॉ. गिरीश आफळे, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे, मुख्याध्यापिका पूनम गुजर आदी उपस्थित होते. 'लाइफ' संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले. 
पाटील म्हणाल्या, "नव्या पिढीला केवळ पुस्तकी ज्ञान देऊन उपयोगाचे नाही. तर, त्यांना मूल्यांवर आधारित व्यावसायिक शिक्षण द्यायला हवे. नेमकी हीच गरज ओळखून गुरूकुलममध्ये विद्यार्थ्यांना विविध कलांचे प्रशिक्षण दिले जात आहे. ही कौतुकास्पद बाब आहे.'' 
"समाजसेवा करावी या हेतूने मंत्री असताना मी समाजकल्याण खाते माझ्याकडे मागून घेत असे. निवृत्तीच्या कालावधीत देखील शक्‍य होईल तेवढी समाजसेवा करण्यावर माझा भर राहणार आहे'', असे पाटील यांनी स्पष्ट केले. 
प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले. विजय विश्‍वकर्मा यांनी परिचय करून दिला. कल्पना बिचकुले या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले. सचिन राठोड यांनी आभार मानले. रवींद्र नामदे, विलास लांडगे, हरी भारती, गतिराम भोईर, नितीन बारणे, शकुंतला बन्सल यांनी संयोजन केले. 

पणती जपून ठेवा.. 
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील या पुनरुत्थान समरसता गुरूकुलममध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या. तेव्हा दिवाळीनिमित्त पणती तयार करणाऱ्या सोनाली फाळके या पाचवीच्या विद्यार्थिनीने त्यांना पणती भेट दिली. 'पणती जपून ठेवा.. अंधार फार झाला..' असाच एक संदेशच त्यातून उपस्थितांना मिळाला. पाटील यांनी पणतीचे पैसे लगेचच गुरूकुलमला देऊ केले. 
 

Web Title: WAR is not an option- pratibha patil