wari-2019 : आई-वडिलांच्या सेवेसाठी आजपासून ‘साथ चल’

wari-2019 : आई-वडिलांच्या सेवेसाठी आजपासून ‘साथ चल’

पिंपरी -  आषाढी वारीची वर्षानुवर्षांची परंपरा जोपासण्यासाठी लाखो वारकऱ्यांची पावले लाडका विठुराया आणि भक्त पुंडलिकाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पडली आहेत. या भगवंत आणि भक्तातील स्नेहाचा आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या घरातील दैवत आई-वडिलांची मनोभावे सेवा करावी, त्यांना प्रेम द्यावे, हा संदेश तरुणांपर्यंत पोचविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’ यांच्यातर्फे ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ या संकल्पनेवर आधारित ‘साथ चल’ दिंडी काढण्यात येणार आहे. तिचा औपचारिक प्रारंभ मंगळवारी (ता. २५) सायंकाळी चार वाजता निगडीतील भक्ती-शक्ती चौकात होणार आहे.

संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या साक्षीने ‘सकाळ’च्या ‘साथ चल’ दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आई-वडिलांच्या सेवेची शपथ देण्यात येणार आहे. या उपक्रमाची वेगवेगळ्या टप्प्यांत विभागणी केली आहे. तुकोबारायांची पालखी भक्ती-शक्ती चौकात आल्यानंतर देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, पालखी सोहळा प्रमुख, विश्‍वस्त, शहरातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘साथ चल’चे औपचारिक उद्‌घाटन होणार आहे. पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोचल्यानंतर टाळ-मृदंगाच्या साथीने समाज आरती होईल. त्यानंतर उपस्थित भाविक व वारकऱ्यांना आई-वडिलांच्या सेवेची शपथ दिली जाणार आहे. या ठिकाणी दिंडीचा पहिला टप्पा संपणार आहे. त्यात शहरातील संस्था, संघटना, विद्यार्थी, तरुण सहभागी होणार आहेत. ‘साथ चल’ दिंडीचा पुढील प्रवास बुधवारी (ता. २६) पहाटे साडेपाच वाजता आकुर्डीतील खंडोबा माळपासून सुरू होईल. वाटचालीतील शेवटचा टप्पा एचए कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ संपेल. 

पुण्यातील टप्पा शुक्रवारी (ता. २८) पूलगेट बसस्थानक असेल. प्रत्येक टप्प्यात आई-वडिलांच्या सेवेची शपथ दिली जाईल. ‘साथ चल’ची मूळ संकल्पना ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांची असून, फिनोलेक्‍स कंपनीने या उपक्रमात मुख्य सहभाग घेतला आहे. तसेच संत तुकाराम महाराज संस्थान आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान यांच्यासह अनेक संस्था, संघटनांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे.

अशी असेल वाटचाल...
मंगळवार (ता. २५) - भक्ती-शक्ती चौक निगडी ते आकुर्डी विठ्ठल मंदिर : दुपारी ४
बुधवार (ता. २६) - खंडोबा मंदिर (माळ) आकुर्डी ते फिनोलेक्‍स कंपनी, मोरवाडी :  पहाटे ५.३० - 
फिनोलेक्‍स कंपनी चौक ते एचए कॉलनी प्रवेशद्वार भुयारी मार्ग :  सकाळी ७
शुक्रवार (ता. २८) -  पूलगेट बसस्थानक पुणे कॅम्प :  सकाळी ७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com