सिग्नलचे उल्लंघन, सुसाट वाहने, अवैध वाहतूक.... 

प्रशांत घाडगे
गुरुवार, 16 मार्च 2017

पुणे - रस्त्यातच उभ्या असणाऱ्या रिक्षा, जीव मुठीत धरून रस्ता ओलांडणारे पादचारी, झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे उभी असलेली वाहने, सिग्नल न पाळता सुसाट वेगाने वाहने चालवणारे चालक...ही परिस्थिती आहे वारजे उड्डाण पुलाखालील चौकाची. 

पुणे - रस्त्यातच उभ्या असणाऱ्या रिक्षा, जीव मुठीत धरून रस्ता ओलांडणारे पादचारी, झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे उभी असलेली वाहने, सिग्नल न पाळता सुसाट वेगाने वाहने चालवणारे चालक...ही परिस्थिती आहे वारजे उड्डाण पुलाखालील चौकाची. 

सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास वारजे चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. कर्वेनगरवरून वारजेकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असून, या ठिकाणी सिग्नल असूनही तो पाळला जात नसल्याने अपघाताची शक्‍यता अधिक आहे. याचबरोबर कर्वेनगर ते वारजेदरम्यान सर्वांत मोठा चौक असल्याने येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे आहे. या चौकातील अनधिकृत वाहने आणि फलक पादचाऱ्यांना अडथळा ठरत आहेत. वारजे उड्डाण पुलाखालील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे गरजेचे आहे. 

समस्या : 
पादचाऱ्यांना अडथळा ठरत असलेल्या रिक्षा 
सिग्नल न पाळणारे वाहनचालक 
रस्त्यामध्येच उभ्या राहत असलेल्या खासगी बस 
पदपथावर अनधिकृत टपऱ्यांचे अतिक्रमण 

उपाययोजना 
चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे आवश्‍यक 
नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांकडून कडक कारवाईची गरज 
अनधिकृत रिक्षाथांबे बंद करावेत 
चौकातील अनधिकृत अतिक्रमणे हटवावीत 
गतिरोधक सुस्थितीत करावेत 

वारजे उड्डाण पुलाखालील चौक सर्वाधिक वर्दळीचा असल्याने या ठिकाणी वाहतूक पोलिस कर्मचारी नेमलेले आहेत. याचबरोबर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे. 
सुनील पाटील, वाहतूक पोलिस निरीक्षक, वारजे 

चांदणी चौकातील स्थिती 
चांदणी चौकातील अनधिकृत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलिसांच्या आशीर्वादामुळे अवैध वाहतूक तेजीत असल्याचे दिसून आले. याचबरोबर पाषाण, मुळशी, पौड, बावधनकडून कोथरूडकडे येणारी वाहने आणि मुंबई एक्‍स्प्रेस हायवेकडून पुण्यात प्रवेश करणारी वाहने एकत्रित येत आहेत. तसेच हा रस्ता तीव्र उताराचा असून, या ठिकाणी कोणतेही गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्‍यता मोठ्या प्रमाणात आहे. 

मुळशी भागातील नागरिक पुण्यामधून रोज ये-जा करत असल्याने वाहनांचीही संख्या वाढलेली आहे. कोथरूडकडून चांदणी चौकमार्गे मुळशी, भूगाव आणि एक्‍स्प्रेस हायवेकडे जाणारी वाहने अधिक आहेत. या ठिकाणी चढावर असलेल्या रस्त्याला गतिरोधक असून, ते चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आलेले आहेत. यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना अडथळे निर्माण होत असून, या ठिकाणी सिग्नलची कोणतीही व्यवस्था नसल्याने वाहनचालकांच्या बेशिस्तीचे प्रमाण वाढले आहे. 

समस्या : 
अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात 
सिग्नलची व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी 
तीव्र उताराला गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्‍यता 

उपाययोजना 
मुळशी, पौड, भूगावकडून येणाऱ्या वाहनचालकांसाठी सिग्नलची व्यवस्था 
बावधनकडून कोथरूडकडे येताना तीव्र उतार असल्याने गतिरोधक उभारणे 
वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे 
अवैध वाहतुकीवर कारवाई करणे 

Web Title: Warje Flyover issue