वारकऱ्यांच्या गर्दीने अलंकापुरी गजबलजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

आळंदी - खांद्यावर भगव्या पताका...गळ्यात तुळशीची माळ आणि टाळ-मृदंगाचा गजर करत राज्यभरातील वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या कार्तिकी वारीसाठी आळंदीत दाखल होत आहेत. दिंड्या आणि खासगी वाहनाने आलेले वारकरी ठिकठिकाणी राहुट्या आणि धर्मशाळांत मुक्कामाची सोय करण्याच्या लगबगीत आहेत.

आळंदीतील देऊळवाड्यात गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने शुक्रवारी (ता. ३०) कार्तिकी वारी सोहळ्यास प्रारंभ होत आहे. या सोहळ्यासाठी मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातून वारकऱ्यांचे आगमन होत आहे. सध्या धर्मशाळा आणि राहुट्यांमध्ये वारकरी मुक्कामास आहेत. अनेकांच्या राहुट्या आज तयार झाल्या तर काहींची राहुट्या उभारण्याबाबत लगबग सुरू होती. माउलींच्या मंदिरात समाधी दर्शनासाठी सकाळपासूनच वारकऱ्यांची गर्दी होती. ठिकठिकाणी वारकऱ्यांचे हरिनाम सप्ताह सुरू आहेत. कीर्तन, प्रवचन, पारायण अशा नैमित्तिक कार्यक्रमात वारकरी दंग आहेत. 

दुसरीकडे, प्रशासनाची वारकऱ्यांना सेवा पुरविण्याची लगबग सुरू आहे. आळंदीतील एसटी बस स्थानकात बहुमजली शौचालय वारकऱ्यांसाठी सज्ज आहे. एसटी स्थानकात बॅरिकेडस उभारण्याचे काम सुरू आहे. शहरातील रस्त्यांवर मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात येत आहेत. दुसरीकडे रस्त्यावरील कचरा गोळा करण्यासाठी नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी काम करीत आहेत. दरम्यान, इंद्रायणीतील जलपर्णी काढण्याचे काम वेगात सुरू असून, वारीसाठी जादा पाणी सोडण्याची मागणी नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Warkari Alandi Kartik Wari