esakal | मंदिर उघडलं, पण कार्तिकी वारीचं काय? सरकारच्या निर्णयाकडे लागले आळंदीकरांचे डोळे
sakal

बोलून बातमी शोधा

Alandi_Mauli

आता यंदाच्या आळंदीतील कार्तिकी वारी सोहळ्याला राज्य शासन परवानगी देणार की, आषाढी वारीप्रमाणेच सोहळा पार पडणार याकडे  वारकरी आणि स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

मंदिर उघडलं, पण कार्तिकी वारीचं काय? सरकारच्या निर्णयाकडे लागले आळंदीकरांचे डोळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आळंदी (पुणे) : दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरे उघडण्यास सरकारने परवानगी दिली, मात्र ८ डिसेंबरपासून आळंदीत सुरू होणार्‍या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी दिनी होणार्‍या कार्तिकी वारीबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे वारकर्‍यांचे लक्ष लागले. सोमवारपासून सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (ता.१४) जाहीर केले. चपला बाहेर काढा आणि तोंडावर मास्क अवश्य लावा, असेही आवाहन नागरीकांना केले आहे. दरम्यान आळंदी ग्रामस्थांसोबत विविध पक्षांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

बारामती : 'लालपरी'ला अच्छे दिन; दिवाळीमुळे सोडाव्या लागल्या जादा गाड्या

आळंदी देवस्थानचे विश्वस्त अॅड. विकास ढगे म्हणाले, ''कोविडच्या पार्श्वभूमीवर दीर्घकाळ मंदिर प्रवेश बंद होता. मात्र देवाचे उपचार नैमित्तिक परंपरा अखंड सुरु होत्या. देवस्थानने भाविकांच्या दर्शनासाठी सोशल मीडियावर माउलींचे समाधी दर्शन सुरू ठेवले होते. सरकारने घेतलेला निर्णयाचे स्वागत होत असून देवस्थानला आता अधिक खबरदारी घ्यावी लागेल. दोन दिवसांनी मंदिर सुरू होत आहे.भाविकांनी गर्दी टाळावी. मंदिरात येण्यापूर्वी थर्मल स्कॅनिंग आणि सॅनिटाझरची सोय केली जाईल. भाविकांनी रांगेतून येताना हस्तांदोलन, स्पर्श करु नये. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. ज्याला कोविड सदृश लक्षणे असतील, त्यांनी इतरांचे आरोग्य जपण्यासाठी मंदिर प्रवेश टाळावा.''

कोरोना लस तयार होतेय; पण ठेवणार कुठं? युरोपमध्ये होतायत भलीमोठी कोल्ड स्टोअरेज​

यावेळी वारकरी भक्तिशक्ती संघाचे अविनाश महाराज पाटील म्हणाले, ''कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून मंदिर बंद असल्याने माऊलींचे थेट समाधीदर्शन झाले नाही. वारकर्‍यांनी संयम ठेवत शासनाचे आदेश पाळले. शासनाने निर्णय घेतला त्याबाबत अभिनंदन, पण आता आमची कार्तिकी वारी चुकणार नाही, याची खबरदारी आता सरकारने घ्यावी.

भाजपाचे शहराध्यक्ष किरण येळवंडे म्हणाले, "भाजपाने ठिकठिकाणी घंटानाद आणि भजन करुन आंदोलन केले. त्याचेच श्रेय आहे. जनरेट्यापुढे सरकारला नमणे भाग पडले. देव आणि भक्तांना शासन फार काळ दूर ठेऊ शकले नाही. आता कार्तिकी वारीसाठी सकारात्मक निर्णय घ्यावा.''

यंदा फटाक्‍यांचा आव्वाज कमीच; खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह कमी​

आता यंदाच्या आळंदीतील कार्तिकी वारी सोहळ्याला राज्य शासन परवानगी देणार की, आषाढी वारीप्रमाणेच सोहळा पार पडणार याकडे  वारकरी आणि स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागले आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यालयात याबाबत महत्वपूर्ण बैठक पोलिस महसूल आणि आळंदी देवस्थानमधे यापूर्वी झाली. मात्र, सरकारच्या आदेशाकडे लक्ष लागले आहे.

संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत भरणारी कार्तिकी वारी कार्तिकी वद्य अष्टमी म्हणजे ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तर संजीवन समाधी सोहळा दिन कार्तिक वद्य त्रयोदशीला (ता.१३ डिसेंबर) आहे. ८ ते १४ डिसेंबर दरम्यान ही यात्रा भरणार आहे. सात दिवस लाखोंचा समुदाय एका ठिकाणी जमा होतो. दुकाने, हॉटेल व्यावसायिक, दिंड्यांना अगोदर तयारी करावी लागते. यामुळे नियंत्रित संख्येत वारी भरण्याबाबत सरकारची भूमिका काय ही उत्सुकता वारकरी, व्यापारी आणि आळंदीकरांना लागून राहिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)