esakal | तर पुण्यातील १०० कोविड हॉस्पिटल्स होणार बंद; पुणे डॉक्टर्स असोसिएशनचा इशारा

बोलून बातमी शोधा

तर पुण्यातील १०० कोविड हॉस्पिटल्स होणार बंद; पुणे डॉक्टर्स असोसिएशनचा इशारा
तर पुण्यातील १०० कोविड हॉस्पिटल्स होणार बंद; पुणे डॉक्टर्स असोसिएशनचा इशारा
sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिव्हिरचा काळाबाजार आदी कारणांमुळे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणे दिवसेंदिवस अवघड होत चालल्यामुळे शहरातील १०० हून जास्त कोविड हॉस्पिटल बंद करण्याचा इशारा पुणे डॉक्टर्स असोसिएशनने पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिला. ऑक्सिजन, औषधे मिळत नसतील तर रुग्णांवर उपचार करणार कसे, त्यांना समजावून सांगणार काय, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

खासगी रुग्णालये आणि कोविड केअर सेंटर्सला ऑक्सिजन पुरेसा आणि वेळेवर मिळत नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे गंभीर असलेल्या इतरत्र हलविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत आहे. त्यातून उपचारांवरही परिणाम होत आहे. तसेच रेमडेसिव्हिरचाही तुटवडा गंभीर आहे. या पूर्वी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) ते मिळत आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याचे वितरण होत आहे. परंतु, त्यातही रुग्णांच्या गरजेनुसार आणि वेळेवर ते उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांबरोबरच डॉक्टरही त्रस्त झाले आहेत. त्याचाही परिणाम उपचारांवर होत आहेत, असे असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी मांगडे तसेच डॉ. सुनील जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा: रेमडेसिवीरची वाढीव दराने विक्री, खोपोलीतील तीघांना अटक

ऑक्सिजन नसल्यामुळे कात्रज भागातील एका कोविड हॉस्पिटलमधून दहा रुग्ण गुरुवारी अन्यत्र हलवावे लागले, असेही त्यांनी सांगितले. ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर मिळत नसेल तर, गंभीर रुग्णांवर उपचार करणार कसे ? हा पुरवठा सुरळीत न झाल्यास कोविड हॉस्पिटल्स बंद करावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रसंगी असोसिएशनचे सचिव डॉ. रविंद्रकुमार काटकर, डॉ. अण्णासाहेब गरड, डॉ. नीरज जाधव आदी उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग वाढता आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करीत आहेत. परंतु, त्यासाठीची आवश्यक साधने आणि सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या नाहीत तर, रुग्णांवर उपचार करण्यास नक्कीच मर्यादा येतील. कोणतेही हॉस्पिटल बंद करण्याची डॉक्टरांची इच्छा नाही. परंतु, सविधा मिळाल्या नाहीत तर नाईलाजाने हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असेही असोसिएशनतर्फे सांगण्यात आले. शहरातील १०० कोविड हॉस्पिटल ४० ते १०० बेडसचे आहेत. त्यात किमान ५ हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. प्रशासनाच्या सहकार्याशिवाय सार्वजनिक आरोग्य सेवा यशस्वी होऊ शकत नाही. पुरेशा सुविधा असतील तरच डॉक्टर्स कोविडच्या रुग्णांना बरे करू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.