पुणे - मांजरी येथे कालव्याच्या भरावावर राडारोडा

कृष्णकांत कोबल
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मांजरी (पुणे) : लक्ष्मी कॉलनी जवळून वाहणाऱ्या नव्या व जुन्या बेबी कालव्याच्या भरावावर राडारोड्यासह विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. त्यामुळे कालवा व त्यालगतच्या रस्त्याला धोका निर्माण होऊन विद्रुपीकरण झाले आहे. 

मांजरी (पुणे) : लक्ष्मी कॉलनी जवळून वाहणाऱ्या नव्या व जुन्या बेबी कालव्याच्या भरावावर राडारोड्यासह विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. त्यामुळे कालवा व त्यालगतच्या रस्त्याला धोका निर्माण होऊन विद्रुपीकरण झाले आहे. 

या कालव्यांच्या भरावावरून शेवाळवाडी, निंबाळकर वस्ती, चंदवाडी, फुरसुंगी आदी भागातील वाहतूक होत आहे. मात्र, तोडलेल्या इमारतींचा राडारोडा, दगड-माती व विविध प्रकारचा कचरा येथील भरावावर मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. अनेक ठिकाणी तो थेट कालव्यात तर काही ठिकाणी थेट कालव्यावरील रस्त्यावर टाकला गेला आहे. तोडलेल्या इमारतीच्या सिमेंट व विटांचे ठोकळे, तुटक्या फरशांचे तुकडे, बांधकामातून निघालेली दगड-मातीचे ढीग येथे लागलेले आहेत. याशिवाय पोल्ट्री, चिकनच्या दुकाणातील वेस्टेज, घरातील अडगळ, जुन्या गोधड्या, गाद्या, उषा, तक्के, वैद्यकीय तसेच इकचरा आदी थेट कालव्यात किंवा त्यालगत टाकले जात आहे. त्यामुळे परिसराला कचरा डेपोचे स्वरुप आले आहे. 

राडारोडा व कचऱ्यामुळे कालव्यावरील रस्ता अरूंद झाला आहे. फुरसुंगी, शेवाळवाडी, निंबाळकर वस्ती, चंदवाडी व नव्याने झालेल्या सोसायट्यांकडे होणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन धोकाही निर्माण झाला आहे. 

गेली अनेक महिन्यांपासून राजरोसपणे टाकल्या जात असलेल्या या राडारोडा व कचऱ्याकडे स्थानिक प्रशासनासह पाटबंधारे विभागाचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथील नागरिक व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनाधिकृतपणे राडारोडा व कचरा टाकणारांवर वेळोवेळी कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

"कालव्यावर राडारोडा किंवा कचरा टाकण्यास कोणालाही परवानगी नाही. त्याबाबत आमच्याकडे तक्रारही आलेली नाही. अनाधीकृतपणे कोणी असे करीत असेल तर लागलीच संबंधितावर कारवाई केली जाईल. नागरिकांना त्याबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरित संपर्क साधावा.''

- सुनील केदार
उप अभियंता, (मालमत्ता) पाटबंधारे विभाग

Web Title: waste on canol support in manjari pune