esakal | कचऱ्याच्या प्रश्‍नाला केराची टोपली!
sakal

बोलून बातमी शोधा

waste

कचऱ्याच्या प्रश्‍नाला केराची टोपली!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेत येण्यापूर्वी ग्रामपंचायतीकडून सोसायट्यांमधील कचरा उचलला जात होता. परंतु महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून कचरा उचलण्यासाठी महापालिकेची गाडीच येत नाही. महापालिकेकडून वेळेत नियमित कचरा उचलला जाईल, अशी अपेक्षा होती. महापालिकेला साध्या कचऱ्याच्या गाड्या पुरवता येत नाहीत. कचऱ्यासाठी नाइलाजास्तव एखाद्या खासगी संस्थेला महिन्याला आठ हजार रुपये द्यावे लागत असतील, तर महापालिकेला कर कशासाठी भरायचा, हा प्रातिनिधिक सवाल आहे, पिसोळी गावातील कांचन ओनेक्स सोसायटीचे अध्यक्ष किशोर ढमढेरे यांचा.

हेही वाचा: पुणे: गिरीश बापट यांनी घेतला विमान विस्तारीकरणासंदर्भात आढावा

या संदर्भात महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी दखल घ्यावी. नवीन समाविष्ट गावांमध्ये महापालिकेकडून कचरा व्यवस्थापनासोबतच पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पिसोळी गावातील रहिवाशांनी केली आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या नऱ्हे गावातही महापालिकेकडून कचरा उचलला जात नव्हता. पैसे दिल्याशिवाय कचरा उचलला जाणार नाही, असे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात असल्याची तक्रार नऱ्हे गावातील नागरिकांनी आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी त्याची दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पिसोळीचे माजी सरपंच नवनाथ मासाळ म्हणाले, की महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून सोसायट्यांमधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. पिण्याचे पाणी आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कचऱ्याचा प्रश्न लवकर मार्गी न लावल्यास पालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल.

हेही वाचा: न विचारता पाणीपुरी आणल्याच्या वादातून महिलेची आत्महत्या;पाहा व्हिडिओ

नागरिकांच्या तक्रारी...

  • महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून ग्रामपंचायतीकडून कचरा उचलणे बंद

  • नव्याने समाविष्ट गावांच्या सोसायट्यांमधील कचरा उचलण्यासाठी महापालिकेने यंत्रणा उभारलेली नाही

  • सोसायटीमध्ये कचऱ्याची गाडी येत नसल्यामुळे कचऱ्याचे ढीग

  • आरोग्याचा प्रश्नही निर्माण

  • सोसायट्यांना नाइलाजाने खासगी संस्थेमार्फत कचरा उचलावा लागतो

  • सोसायटीला किमान पाच ते आठ हजार रुपये मोजावे लागतात

  • परिणामी सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो

हेही वाचा: ‘मृत्युंजय' च्या तब्बल ३० व्या आवृत्तीचे पुण्यात प्रकाशन

"महापालिकेकडून बहुतांश समाविष्ट गावांमधील कचरा उचलला जात आहे. महापालिकेने कचरा उचलण्यासाठी खासगी संस्थेला परवानगी दिलेली नाही. महापालिकेकडून सोसायट्यांमधील कचरा उचलला जात नसल्यास त्याची माहिती घेण्यात येईल, तसेच महापालिकेकडून आवश्यक यंत्रणा उभारण्यात येईल."

- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

loading image
go to top