पवना नदीपात्रात थेट मिसळते नाल्यांतून सांडपाणी

दीपेश सुराणा
मंगळवार, 26 जून 2018

पिंपरी - पवना नदीपात्रामध्ये शहरातील काही झोपडपट्ट्यांचे थेट नाल्याद्वारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी मिसळत आहे. चिंचवड, भोसरी औद्योगिक वसाहतीतील वाहून येणारे रसायनमिश्रित सांडपाणी त्याशिवाय, बोपखेल, ताथवडे, थेरगाव, पिंपरी येथील नाल्याचे पाणी देखील थेट नदीपात्रात मिसळत असल्याने पवनेचे पाणी प्रदूषित होत आहे. रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होऊन जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पिंपरी - पवना नदीपात्रामध्ये शहरातील काही झोपडपट्ट्यांचे थेट नाल्याद्वारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी मिसळत आहे. चिंचवड, भोसरी औद्योगिक वसाहतीतील वाहून येणारे रसायनमिश्रित सांडपाणी त्याशिवाय, बोपखेल, ताथवडे, थेरगाव, पिंपरी येथील नाल्याचे पाणी देखील थेट नदीपात्रात मिसळत असल्याने पवनेचे पाणी प्रदूषित होत आहे. रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होऊन जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

शहरातून 24.5 किलोमीटर अंतरात पवना नदी वाहते. पवना नदी किवळे, रावेत येथे शहरात प्रवेश करून चिंचवड, पिंपरी, पिंपळेसौदागर, रहाटणी मार्गे सांगवी, दापोडी-हॅरिस पुलाजवळ मुळा नदीला मिळते. 

पिंपरी येथील पवना नदीपात्रात थेट नाल्याचे पाणी मिसळत असल्याचे "दै.सकाळ'च्या प्रतिनिधीला प्रत्यक्ष पाहणीत आढळले. त्याशिवाय, थेरगाव पूल येथे देखील गटाराचे सांडपाणी नदीत मिसळत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. पवना नदीकाठच्या नाल्यांमध्ये विशेषतः झोपडपट्ट्यांतून थेट जमा होणारे सांडपाणी मिसळते. शहरातील औद्योगिक क्षेत्रातील लघुउद्योगांतून तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला आहे. एमआयडीसी, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी दिलेला आहे. मात्र, अद्याप प्रत्यक्ष कामकाज सुरू झालेले नाही. 

सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सध्या शहरामध्ये 9 ठिकाणी 13 मैलाशुद्धीकरण केंद्र आहेत. चऱ्होली येथे दररोज 20 दशलक्ष लिटर क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. चिखली (12 दशलक्ष लिटर), पिंपळेनिलख (15 दशलक्ष लिटर), बोपखेल (5 दशलक्ष लिटर) येथील मैलाशुद्धीकरण केंद्राच्या कामांसाठी निविदा कार्यवाही सुरू आहे. 

* शहरात होणारा पाणीपुरवठा (महापालिका व एमआयडीसी) : 469.31 दशलक्ष लिटर (प्रतिदिन) 
* पाण्याची गळती (25 टक्के) : दररोज 117.33 दशलक्ष लिटर 
* निर्माण होणारे घरगुती सांडपाणी : दररोज सरासरी 290 दशलक्ष लिटर 
* शहरात टाकलेल्या मलनिस्सारण नलिकांची लांबी : 1472 कि.मी. 
* सध्या प्रक्रिया करण्यात येणारे सांडपाणी : दररोज 265 दशलक्ष लिटर 

शहरातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये थेट मिसळणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी महापालिकेतर्फे चार ठिकाणी नव्याने मैलाशुद्धीकरण केंद्रांची कामे हाती घेतली आहेत. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ताथवडे गावासाठी 10 दशलक्ष लिटर क्षमतेचा मैलाशुद्धीकरण केंद्र उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. संबंधित जागेचा ताबा अद्याप बाकी आहे. 
- संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता (पर्यावरण) 

पवना नदीमध्ये प्रक्रिया न करता मिसळणाऱ्या सांडपाण्याबाबत महापालिकेतर्फे कार्यवाही व्हायला हवी. संबंधित सांडपाण्याची शास्त्रीय पद्धतीने आकडेवारी मिळायला हवी. घरगुती सांडपाण्याशिवाय उद्योगांतून मिसळणारे घातक रसायनमिश्रित सांडपाणी किती व ते सोडणारे कोण, याचीही आकडेवारी मिळावी. रसायनमिश्रित सांडपाणी सोडणाऱ्यांना महापालिका पर्यावरण विभागाने नोटिसा बजावणे आवश्‍यक आहे. नदीपात्रात मिसळणारे सल्फर, हायड्रोक्‍लेरिक ऍसिड आदी रासायनिक द्रव्यांमुळे जलचरांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. 
- विकास पाटील, पर्यावरण तज्ज्ञ 

Web Title: Wastewater drained directly into pavina river