प्रत्येक नगरसेवकावर सीसीटीव्हीसारखी नजर 

प्रत्येक नगरसेवकावर सीसीटीव्हीसारखी नजर 

पुणे - निवडणुकीमध्ये कोण काम करत आहे? कोणाच्या प्रभागात किती मते पडली? यासह प्रत्येक नगरसेवक काय करत आहेत, याची सर्व माहिती मिळते. तुमच्यावर सीसीटीव्हीसारखी नजर आहे. महापालिका निवडणुकीत स्वतःचा जसा प्रचार केला, तसा लोकसभेसाठी करा, असा इशारावजा आदेश लोकसभेचे उमेदवार, पालकमंत्री गिरीश बापट यांनी नगरसेवकांना दिला. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात भाजप, शिवसेना, रिपाइंच्या नगरसेवकांची पहिली संयुक्त बैठक सोमवारी सायंकाळी पार पडली. या वेळी महायुतीतील पक्षांचे पदाधिकारी, आमदार, पुणे महापालिका तसेच पुणे कॅंटोन्मेंट आणि खडकी कॅंटोन्मेंटचे नगरसेवक उपस्थित होते.  नगरसेवकांनी घरोघरी जाऊन सरकारच्या कामांची माहिती मतदारांना द्यावी. बुथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख यांच्यामध्ये समन्वय ठेवावा, प्रभागातही सभांचे आयोजन करावे, अशी सूचना नगरसेवकांना देण्यात आली. प्रचार करताना त्यात ढिसाळपणा येऊ न देता, प्रत्येक गोष्टीचे नियोजन करा, हे सांगताना बापट यांनी रामभाऊ म्हाळगी यांची एक आठवणही बैठकीत सांगितली. शिवसेना, रिपाइंनेही या वेळी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

‘सर्वांनी एकदिलाने काम करावे’
‘‘बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील सर्वच घटक पक्षांनी एकदिलाने काम करावे आणि भाजपच्या उमेदवार कांचन कूल यांना निवडून आणावे,’’ असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुण्यात या सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीत केले. महायुतीचे लोकसभा निवडणुकीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, ‘रासप’चे आमदार ॲड. राहुल कुल, आमदार माधुरी मिसाळ, उमेदवार कांचन कूल आदींसह भाजप, सेना, रासप आणि रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले, ‘‘भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पराभव होऊ शकतो, तर सुप्रिया सुळे यांचा का होऊ शकणार नाही?’’ बापट म्हणाले, ‘‘प्रत्येक गावांत आणि वाडी-वस्तीवर महायुतीची धोरणे आणि निर्णय मतदारांपर्यंत पोचावेत. ’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com