पाच लाख कर भरणाऱ्यांवर ‘नजर’

सुधीर साबळे
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

पिंपरी - केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजारांच्या नोटा बंद केल्यानंतर अनेकांनी थकीत मिळकत कराची रक्‍कम महापालिकेकडे जमा करण्यास सुरू केली. पिंपरी-चिंचवडमधील सुमारे २९ जणांनी पाच लाख रुपयांपैक्षा अधिक कर भरल्याची माहिती पुढे आली आहे. मोठ्या प्रमाणात मिळकतकर भरणाऱ्यांची माहिती प्राप्तिकर खात्याने प्रत्येक महापालिकेकडे मागविली.

पिंपरी - केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजारांच्या नोटा बंद केल्यानंतर अनेकांनी थकीत मिळकत कराची रक्‍कम महापालिकेकडे जमा करण्यास सुरू केली. पिंपरी-चिंचवडमधील सुमारे २९ जणांनी पाच लाख रुपयांपैक्षा अधिक कर भरल्याची माहिती पुढे आली आहे. मोठ्या प्रमाणात मिळकतकर भरणाऱ्यांची माहिती प्राप्तिकर खात्याने प्रत्येक महापालिकेकडे मागविली.

त्यानुसार ही यादी महापालिकेने प्राप्तिकर खात्याला दिली असल्याचे समजते. मोठ्या प्रमाणात कर भरणाऱ्यांची यादी प्राप्तिकर खात्याकडून सविस्तर छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर या संदर्भातील कारवाईची दिशा ठरविण्यात येणार आहे, असे प्राप्तिकर खात्याच्या सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या माध्यमातून महापालिकेत मिळकतकरापोटी ४५ कोटी ४१ लाखांची रक्‍कम जमा झाली आहे.  नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर हा कर भरण्यासाठी जुन्या नोटा घेतल्या जाणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये अल्पावधीत मोठ्या प्रमाणात कराची रक्‍कम जमा झाली. या योजनेत थकीत प्रॉपर्टी टॅक्‍सची रक्‍कम पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटांमध्ये भरली आहे. मोठ्या प्रमाणात कराची रक्‍कम भरणाऱ्या मंडळींनी प्राप्तिकर भरला आहे का, आदींची तपासणी करण्यात येणार असल्याचे समजते. 

प्राप्तिकर विभागाकडून यासंदर्भात करण्यात येणाऱ्या कारवाईमध्ये कराची रक्‍कम भरणाऱ्यांची यादी आल्यानंतर त्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यामधील संबंधितांना पत्र पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागवला जाणार आहे. येत्या महिन्याभराच्या अवधीत ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्‍यता आहे. प्राप्तिकर खात्याच्या पुणे विभागात नाशिक, जळगाव, धुळे, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हा भाग येतो. 

दोन टप्प्यांत मोहीम
पिंपरी-चिंचवड महापालिकेत ११ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यानच्या अवधीत ४५ कोटी ४१ लाख रुपये मिळकतकरापोटी जमा झाले आहेत. यात ३६ कोटी ४७ लाख रुपये हे जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात जमा झाले आहेत. शहरातील एक हजार ३६७ जणांनी ५० हजारांच्या पुढे कर भरला आहे. ही रक्‍कम १५ कोटी ७२ लाख २२ हजार रुपये आहे. हा कर भरण्यासाठी दोन टप्प्यांत मोहीम राबविण्यात आली होती. त्यात ३९ कोटी २८ लाख रुपये सर्वाधिक रक्‍कम ११ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत जमा झाली आहे.

Web Title: watch on five million tax deposit