कडबनवाडी वनक्षेत्रात रात्रंदिवस पहारा

मनोहर चांदणे : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

कडबनवाडी (ता. इंदापूर) वनक्षेत्रातील "वन्यजीव अधिवासास पर्यटकांकडून धोका', अशी बातमी मंगळवारी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली. त्याची वनविभागाने तातडीने दखल घेत वनक्षेत्रातील नव्या वाटा बंद करण्यास सुरुवात केली. येथे तीन अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून, दिवसरात्र ते गस्त घालणार आहेत. वन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

वाहनांच्या नव्या वाटा बंद; तीन अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक

निमगाव केतकी (पुणे) : कडबनवाडी (ता. इंदापूर) वनक्षेत्रातील "वन्यजीव अधिवासास पर्यटकांकडून धोका', अशी बातमी मंगळवारी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली. त्याची वनविभागाने तातडीने दखल घेत वनक्षेत्रातील नव्या वाटा बंद करण्यास सुरुवात केली. येथे तीन अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून, दिवसरात्र ते गस्त घालणार आहेत. वन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

वनक्षेत्रातील लांडगा, तरस यासह अन्य वन्यप्राण्यांचे जवळून फोटो काढण्यासाठी मोठ्या शहरातून येणारे काही हौशी पर्यटक सर्व नियम धाब्यावर बसवून पहाटेपासूनच त्या प्राण्यांच्या आधिवासाजवळ चारचाकी गाड्यांचा सापळा लावतात. मोठ्या शहरातून येणाऱ्या पर्यटकांना भिगवण (ता. इंदापूर) येथील काही जण घेऊन जात होते. प्राणी जवळून दाखविण्यासाठी तीन ते पाच हजार रुपये पर्यटक मोजत होते. फ्रेंडस ऑफ नेचरच्या सदस्यांना ही माहिती मिळाल्यानंतर रविवारी (ता. 1) पहाटे ते तिथे गेल्यानंतर दहा ते बारा गाड्या पहाटेपासून सापळा लावल्यासारख्या दिसून आल्या होत्या. त्याबाबतचे वृत्त आज "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते.

इंदापूरचे वनक्षेत्रपाल राहुल काळे म्हणाले, ""सकाळमधील बातमीची दखल घेत कडबनवाडी वनक्षेत्रात नव्याने पाडलेल्या सर्व वाटा बंद करण्यास आम्ही सुरुवात केली आहे. दिवसा व रात्री गस्त घालण्यासाठी तीन जादा कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. पर्यटकांनी वनकायद्याचे उल्लंघन केल्यास तातडीने गुन्हे दाखल केली जातील. येथील वन्यजीवांचा अधिवास धोक्‍यात येणार नाही, याची आम्ही शंभर टक्के दक्षता घेऊ.''

या गंभीर प्रश्‍नाची वनविभागाने तातडीने दखल घेतल्यामुळे फ्रेंड्‌स ऑफ नेचरचे सदस्य वैभव जाधव, ऍड. सचिन राऊत, ऍड. श्रीकांत करे यांनी समाधान व्यक्त केले. वनविभागाने अधिक सतर्क राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 
पर्यटकांचे आयडेंटीफिकेशन करा : जिल्हाधिकारी
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही या वृत्ताची दखल घेतली. "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, ""निसर्गातील जैवविविधतेचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. मागील वर्षीच्या दुष्काळात या भागाला मी भेट दिली होती. वन्यजीवांच्या पाण्यासह अन्य सुविधांसाठी 70 लाखांचा निधी मंजूर केला होता. एका महिन्यात त्याबाबत कार्यवाही झाल्याने त्याचा फायदा वन्यप्राण्यांना झाला होता. वन्यजीवांच्या अधिवासास धोका होत असेल तर ही गंभीर बाब आहे. वनविभागाने सतर्क राहावे, यासाठी त्यांना लेखी सूचना करण्यात येईल. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचे आयडेंटीफिकेशन केले पाहिजे. पर्यटकांनी नियमाचे उल्लंघन न करता त्याचा आनंद घेतला पाहिजे. येथील चिंकाराच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत.''
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watch overnight in Kadbanwadi forest