‘वॉटर एटीएम’ भागवतेय तहान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

पुणे - मंगळवारी दुपारी रणरणत्या उन्हातून चालत जाणाऱ्या ७० वर्षीय आजी पिण्याचे पाणी शोधत होत्या. त्यांची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या ‘वॉटर एटीएम’वर पडली. ‘वॉटर एटीएम’मधले थंडगार पाणी पिऊन आजी सुखावल्या. अशा असंख्य कष्टकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांची तहान भर उन्हाळ्यात भागविण्याचे काम पुणे कॅंटोन्मेंट प्रशासनाने बसविलेले ‘वॉटर एटीएम’ करीत आहेत.

कॅंटोन्मेंटवासीयांना स्वच्छ व थंडगार पाणी पिण्यास मिळावे, यासाठी ‘वॉटर एटीएम’ बसविण्याची संकल्पना पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे पदाधिकारी, सदस्य व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मागील वर्षी मांडली. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी केदारी रस्ता, श्रीकृष्ण चौक, नवीन मोदीखान्यातील हिदायतुल्ला रस्ता आणि वानवडीतील मथुरावाला क्रीडा केंद्राजवळ ‘वॉटर एटीएम’ बसविण्यात आले. सुरवातीला नागरिकांनी या ‘वॉटर एटीएम’कडे दुर्लक्ष केले. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर उन्हाची तीव्रता जसजशी वाढली, तशी ‘वॉटर एटीएम’मधील पाणी पिण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे.  

उपाध्यक्ष अतुल गायकवाड म्हणाले, ‘‘कॅंटोन्मेंटचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. लोकांना स्वच्छ व चांगल्या दर्जाचे पाणी पिण्यास देण्यासाठी बोर्ड प्रशासन प्रयत्नशील आहे. आणखी चार वॉर्डांमध्ये ‘वॉटर एटीएम’ बसविले जाणार आहेत.’’

‘वॉटर एटीएम’ला पाणी कमी पडू नये, यासाठी दोन हजार लिटरच्या पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली आहे. तर श्रीकृष्ण चौकातील ‘वॉटर एटीएम’ विजेच्या अभावामुळे बंद आहे, तेथे नवीन वीजमीटर बसविण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: water atm in pune