Property Tax : पुणे महापालिकेचा पराक्रम! मिळकतकर वसुलीसाठी पाणी बंदी

मिळकतकराची थकबाकी वसुली करण्यासाठी ऐन उन्हाळ्यात थेट नळ जोड तोडण्याचा ‘पराक्रम’ महापालिकेने केला आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal

पुणे - मिळकतकराची थकबाकी वसुली करण्यासाठी ऐन उन्हाळ्यात थेट नळ जोड तोडण्याचा ‘पराक्रम’ महापालिकेने केला आहे. आधीच असमान पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण असताना त्यातच पाणी तोडल्याने नागरिकांचे प्रचंड हाल सुरु झाले आहे. मिळकतकर विभागाच्या या कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पुणे महापालिकेचा खर्चाचा भार वाढत असताना उत्पन्न वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये प्रमुख्याने बांधकाम विकास विभाग, मिळकतकर विभाग, जीएसटी संकलनातील हिस्सा याचा समावेश आहे. त्यामुळे २०२३-२४ हे आर्थिक वर्ष संपताना प्रशासनाने थकबाकी वसुलीवर भर दिला होता. त्यामध्ये थकबाकी न भरणाऱ्या नागरिकांच्या व्यावसायिक मिळकती सील करणे, मिळकतीपुढे बॅन्ड वाजविणे या कारवाईचा समावेश होता. गेल्यावर्षभरात एकूण २२६७ कोटी ९ लाख रुपयांचे कर संकलन झाले आहे.

मिळकतकरातून उत्पन्न वाढत असले तरी थकबाकी आकडाही १० हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. शासकीय संस्था, कार्यालये, शिक्षण संस्था, व्यावसायिक इमारती, राजकीय नेत्यांच्या मिळकतींची कोट्यावधी रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम वसुलीसाठी कायदेशीर मार्ग असताना मिळकतकर विभागाने थेट पाणी तोडण्याचा प्रकार शहरात सुरु केला आहे. उन्हाचा चटका वाढत असताना नागरिक त्यामुळे हैराण झालेले आहेत.

पण त्यातच महापालिका थेट पाणी तोडत असल्याने नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांनी कर भरला नाही तर त्यावर दरमहा दोन टक्के व्याज आकारले जात आहे. त्यामुळे थकबाकीची रक्कम वाढत जाऊन संबंधित मिळकतधारकास मोठा भूर्दंड सहन करावा लागतो. असे असतानाही महापालिका थेट पाणी बंद करत असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

पाणी तोडल्यामुळे इमारतीमध्ये स्वच्छतागृह, कार्यालयांमध्ये पाणी उपलब्ध नाही, मध्यवर्ती भागातील नागरिक शेजारच्या वाड्यातून, घरातून पाणी आणून दिवस भागवत आहेत. तर काही जण टँकर मागवीत आहेत. शहरात कोट्यावधी रुपयांचा कर थकविणारे अनेक धनाढ्य व्यावसायिक, शिक्षण संस्था, रुग्णालये आहेत. पण त्यांच्यावर कारवाई न करता अवघ्या काही लाखाचा कर थकल्याने सामान्य नागरिकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात मिळकतकर विभागाचे प्रमुख माधव जगताप यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पाणी पुरवठा विभाग अंधारात

मिळकतकर विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी नळ जोड तोडण्याची कारवाई सुरु केली आहे. पण याबाबत पाणी पुरवठा विभागच अंधारात असल्याचे समोर आले आहे. आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना न देता ही कारवाई केली जात असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘गुरुवार पेठेमध्ये आमच्या संस्थेचे वसतीगृह गेल्या दोन वर्षापासून बंद आहे, त्यामुळे सुमारे सात लाख रुपयांचा मिळकतकर थकला आहे. त्यामुळे महापालिकेने ऐन उन्हाळ्यात नळजोड तोडून पाणी बंद केल्याने हाल होत आहेत. पाणी नसल्याने व्यायामशाळेत येणारे तरुण देखील कमी झाले आहेत. पाणी पुरवठा सुरु करावा अशी विनंती केली तरीही गेल्या महिन्याभरापासून पाणी सुरु झालेले नाही.’

- जॉनी जाधव

‘मिळकतकराच्या थकबाकीचा आकडा १० हजार कोटीच्या पुढे गेला आहे. अनेकांची कोट्यावधी रुपये थकबाकी आहे. पण त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यास टाळाटाळ केली जाते. पण प्रशासन अरेरावी करत सामान्य नागरिकांचे पाणी बंद करत आहे. महापालिकेने हा तुघलकी कारभार थांबवावा.’

- ऋषिकेश बालगुडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com