सिध्देश्वर निंबोडी जलसंधारण कामांमुळे होणार पाणीदार

संतोष आटोळे
गुरुवार, 12 जुलै 2018

सिध्देश्वर निंबोडी या गावाने 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत यंदा भाग घेतला होता. त्यानुसार स्पर्धेच्या कालावधीत येथे विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली.

शिर्सुफळ - सिध्देश्वर निंबोडी (ता. बारामती) येथे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती ॲग्रो व 'सकाळ' रिलीफ फंडाच्या वतीने ओढा खोलीकरणाचे 700 मीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच नव्याने मातीलाही तयार करण्यात आला आहे. यामुळे चार कोटीहून लिटरहून अधिक पाण्याचा साठा होणार आहे. याबाबत ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

सिध्देश्वर निंबोडी या गावाने 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत यंदा भाग घेतला होता. त्यानुसार स्पर्धेच्या कालावधीत येथे विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली. येथील ओढ्याचे खोलीकरण तसेच माती नाला व समतल चर खोदण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी व तनिष्का व्यासपीठाच्या वतीने जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्याकडे केली होती. त्यानुरुप देण्यात आलेल्या पोकलेश मशिनसाठी सकाळ रिलीफ फंडामधुन डिझेलसाठी निधी देण्यात आला.

त्यानुसार झालेल्या खोलीकरणाच्या माध्यमातून येथील ओढ्याचे 700 मीटर लांबी,  सरासरी 12 ते 15 मीटर रुंदी व 2 ते 3 मीटर खोलीकरण करण्यात आले. तसेच गाव परिसरातील डोंगरी भागामध्ये मातीनाला तयार करण्यात आला. याबरोबरच जलंसधारणाच्या साठी सलग समतल चर खोदुन पाणी आडवा पाणी जिरवा मोहिम राबविण्यात आली. यासर्व माध्यमातुन एकूण 40 हजारहुन अधिक घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. याकामामुळे 4 कोटी 80 लाख लिटर एवढा पाणीसाठा होणार आहे. तसेच आगामी काळात मोठ्या प्रमाणावर पाणी जमिनीमध्ये मुरणार आहे. यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढ होणार आहे.

यंदा येथे करण्यात आलेल्या विविध जलसंधारण कामांमुळे मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी अडून ते जमिनीत जिरल्याने दुष्काळ आणि पाणी टंचाई संपुष्टात येवून गाव पाणीदार होईल असा विश्वास सरपंच मनिषा किशोर फडतरे, उपसरपंच नितीन विधाते, ग्रामसेवक रंजना आघाव, किशोर फडतरे, सुनिल उदावंत, संजय काकडे, संतोष नगरे यांनी व्यक्त केला. 

सामाजिक चळवळीत सकाळ सक्रिय -
याबाबत बोलताना माजी सरपंच किशोर फडतरे व माजी उपसरपंच सुनिल उदावंत म्हणाले, गावात जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या पुढाकारातुन विविध विकास कामे सुरु आहेत. यामध्ये जलसंधारण कामांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.यानुरुप ओढा खोलीकरणाचे काम चांगल्या पध्दतीने करण्यात आले आहे. यामुळे आगामी काळात पावसाचे पाणी अडून ते जमिनीत जिरल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. यामुळे गावचा पाणीप्रश्न कायमचा दुर होईल. जलसंधारणासारख्या चळवळीमध्ये सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सकाळ माध्यम समुहाचा सक्रिय सहभाग कौतुकास्पद आहे. यामुळे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने 'सकाळ' समुहाचे विशेष आभार मानतो.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Water conservation works will be done at Siddheshwar Nimbodi