पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा, तर शेतीसाठी कालव्यातून सोडण्यात येणारी तीन आवर्तने एवढा पाणीसाठा जमा आहे.

खडकवासला - खडकवासला धरण शंभर टक्के भरल्यामुळे गुरुवारी पहाटेपासून रात्री दहा वाजेपर्यंत चार हजार २८० क्‍युसेकपर्यंत पाणी सोडण्यात आले. पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा, तर शेतीसाठी कालव्यातून सोडण्यात येणारी तीन आवर्तने एवढा पाणीसाठा जमा आहे.

पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चारही धरणांत मिळून आतापर्यंत १२ टीएमसी म्हणजे ४१.२७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे, असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले. 

धरण परिसरात बुधवार (ता. १०) पासून गुरुवारी दुपारपर्यंत मुसळधार पडत होता. या चारही धरणांत मिळून सुमारे दोन टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला होता.

गुरुवारी पहाटे दोन वाजता १३०० क्‍युसेकपेक्षा जास्त येवा होता. धरण शंभर टक्के भरले. धरणाच्या कालव्यातून ५०० आणि मुठा नदीत ८५६ क्‍युसेक पाणी सोडून धरणाची पातळी कायम राखण्यात आली. दुपारी एक वाजता चार हजार २८० क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. 

तेरा दिवसांत बारा टीएमसी
चारही धरणांत २८ जूनला २.२० टीएमसी म्हणजे ७.५४ टक्के पाणी शिल्लक होते. त्यानंतर मुसळधार पावसामुळे या १३ दिवसांत सुमारे १२.०३ टीएमसी म्हणजे ४१.२७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुठा नदीत, कालव्यात एक टीएमसी पाणी सोडले आहे. तेरा दिवसांत तेरा टीएमसी वाढले, तर बुधवारी संध्याकाळी १०.६२ टीएमसी होता, तो दोन टीएमसीने वाढला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water for eight months to punekar