खडकवासलाचे पाणी अखेर इंदापूरात दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

कळस : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे व तालुक्यातील लोकप्रतिनीधींच्या रेट्यामुळे अखेर खडकवासला कालव्याचे पाणी आज इंदापूर तालुक्यात पोचले. पावसाने पाठ फिरविल्याने गेल्या काही दिवसांपासून खडकवासला कालव्याच्या पाण्याकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याची स्थिती निर्माण झाली होती. परंतु आता कालव्याचे पाणी तालुक्यात दाखल झाल्यानंतर कालव्यालगतच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कळस : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे व तालुक्यातील लोकप्रतिनीधींच्या रेट्यामुळे अखेर खडकवासला कालव्याचे पाणी आज इंदापूर तालुक्यात पोचले. पावसाने पाठ फिरविल्याने गेल्या काही दिवसांपासून खडकवासला कालव्याच्या पाण्याकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याची स्थिती निर्माण झाली होती. परंतु आता कालव्याचे पाणी तालुक्यात दाखल झाल्यानंतर कालव्यालगतच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज दुपारी 12 च्या सुमारास तालुक्यात खडकवासला कालव्याच्या पाण्याने प्रवेश केला. उद्या सकाळपर्यंत कळस परिसरात पाणी पोचण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपर्यंत (ता. 21) इंदापूरमध्ये (202 कि.मी.) पाणी पोचेल. या पाण्याचा तालुक्यातील सुमारे 15 ते 20 हजार हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे. दरवर्षी या महिन्यांमध्ये खळाळून वाहणारे ओढे, नाले सध्या कोरडे पडले आहेत. जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे.

विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठला आहे. यामुळे कालव्याच्या पाण्याचा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार आहे. परंतू गेल्या काही दिवसांपासून मागणी करुनही शेतकऱ्यांना पाणी दिले जात नव्हते. याबाबत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला होता.

शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी तातडीची बैठक घेतली होती. यामध्ये तालुक्यातील कालव्याचे आवर्तन तातडीने सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. यावेळी कालव्याचे पाणी सोडण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. यानुसार तालुक्यासाठी कालव्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे.  

सध्या रब्बीतील पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. जोरदार पाऊस झाल्यास ज्वारीच्या पेरणीस शेतकरी प्राधान्य देतील. याचबरोबर जळून चाललेली चारापिके, तरकटलेल्या उसाच्या पिकाला कालव्याच्या पाण्याचा उपयोग होणार आहे. कालव्याच्या पाण्याच्या जीवावर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजनांनाही या पाण्याचा उपयोग होईल. मात्र पाणी वितरणाचे योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. 

उन्हाळ्यात खडकवासला कालव्याला दोन आवर्तने मिळाली. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र एेन पावसाळ्यात पिके जळून चाललेली असताना, कालव्याच्या पाण्याचे राजकारण होऊन ते अचानक बंद करण्यात आले होते. यावर शेतकऱ्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना धारेवर धरुन तालुक्यात पाणी आणल्यामुळे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या दमदार आमदार आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

दरम्यान, बळीराजा शेतकरी संघातर्फे 'सकाळ'चे आभार मानण्यात आले. संघाचे राज्य संघटक अनिल खोत म्हणाले, तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची गरज ओळखून सकाळने वार्तांकन केल्यामुळे पाटबंधारे विभागाला पाणी देणे भाग पडले आहे. खरेतर हे पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी आहे. मात्र राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पळवत आहेत. पण 'सकाळ'ने या विषयाला वाचा फोडली.

Web Title: The water of the Khadakwasla water finally entered the Indapur