भय इथले संपत नाही... (व्हिडिओ)

जागृती कुलकर्णी
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

सिंहगड रस्ता - कालवा, जलशुद्धीकरण केंद्रामुळे सिंहगड रस्ता परिसरात खालच्या भागातील रहिवाशांच्या मनावर भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे आजच्या घटनेने अधोरेखित झाले आहे.

सिंहगड रस्ता - कालवा, जलशुद्धीकरण केंद्रामुळे सिंहगड रस्ता परिसरात खालच्या भागातील रहिवाशांच्या मनावर भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे आजच्या घटनेने अधोरेखित झाले आहे.

सिंहगड रस्ता परिसरात सप्टेंबर २०१८ मध्ये कालवा फुटल्याने अनेकांचे संसार वाहून गेले. त्यावर महापालिका तसेच संबंधित घटकांकडून फुंकर घालण्यात आली. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी व्हॉल्व्हच्या बिघाडामुळे पाण्याची टाकी भरून वाहिल्याने जलप्रलयाचा अनुभव या परिसरातील नागरिकांना आला. या जलप्रलयामुळे मोठे नुकसान झाले नसले तरी कालवा आणि जलशुद्धीकरण केंद्राजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला.

खडकवासला येथून येणाऱ्या कालव्याची डावी बाजू खाली आहे, तर उजवी बाजू उंचावर आहे. कालवा फुटीची घटना घडल्यास पाणी खालच्या बाजूसच येते. परिणामी, येथील रहिवाशांना नुकसानास सामोरे जावे लागते. या सगळ्या बाबींची भीती नागरिक बोलून दाखवतात.

सीमाभिंतीमुळे वाचली घरे
रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमधील टाकीच्या मागील भागातून पाणी वाहण्यास सुरवात झाली. पाण्याचा प्रवाह खूप मोठा होता. मात्र, पंपिंग स्टेशनच्या सीमाभिंतीमुळे येथील घरांमध्ये पाणी शिरले नाही. या भागात पाणी शिरले असते, तर मोठा अनर्थ घडला असता. केवळ टाकीच्या आजूबाजूच्या परिसरातून पाणी थेट मुख्य रस्त्याकडे वाहिले. 

कालवा फुटला त्या वेळी खालच्या भागातील नागरिकांचे हाल झाले. आमची घरे तर पाण्याच्या टाकीजवळच आहेत. त्यामुळे कधी काय विपरीत घडेल का, असेच सारखे मनात येत असते.  
- लक्ष्मी कांबळे, रहिवासी  

दररोजच कामे सुरू असतात. आजचा दिवस गेला की मगच ‘हुश्‍श’ होते. आजचा दिवस सुखासुखी गेला असे वाटते; पण उद्या उगवणारा दिवस काय घेऊन येणार आहे, ही चिंता कायम असते. 
- सकू शिंदे, रहिवासी

ओसरी, भांडी गेली वाहून!
सिंहगड रस्ता -
पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील ‘रॉ वॉटर पंपिंग स्टेशन’ची टाकी ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने शेजारील नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले. पाण्याचा प्रवाह इतका होता, की या प्रवाहात घराच्या बाहेरील ओसरी व ओसरीतील भांडी आणि इतर साहित्य वाहून गेले. काही घरांमध्ये पाणी शिरले. 

इंदूबाई दुमडे - पाण्याच्या टाकीजवळच आमचे घर आहे. त्यामुळे पाणी थेट घरात शिरले. पाण्याचा प्रवाह इतका होता की घरातील वस्तू उचलून बाहेर ठेवणे अवघड झाले. अखेर घरातील मोरीला भगदाड पाडून पाण्याला जाण्यासाठी वाट केली. स्वयंपाकाच्या ओट्याखालीदेखील भगदाड पाडले. त्यातून पाणी पलीकडे गेले. १५ किलो गहू, १० किलो तांदूळ आणि इतर खाण्याचे सामान ओले झाले. 

अमृता दुमडे - सकाळी साडेसहा-सातच्या सुमारास उठलोही नव्हतो. तेवढ्यात पाणी आले. पाणी घरात शिरले म्हटल्याबरोबर मी माझ्या बाळाला उचलून घराबाहेर आले. घरातील सर्व सामान ओले झाले आहे.  

पांडुरंग कांबळे - सकाळी मुली शाळेत गेल्या. बाकी सर्व जण घरातच होतो. अचानक पाणी आल्याने घराबाहेरील ओसरीवरील सामान वाहून गेले. 
ओसरीला मोठे भगदाड पडले. सुदैवाने अधिक नुकसान झाले नाही.  

Web Title: water leakage singhgad road pune