शहराच्या भूजल पातळीत घट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

शहरात पाणीटंचाई असतानाच वाढलेली बांधकामे आणि सिमेंट-काँक्रीटच्या जाळ्यामुळे शहरातील भूजल पातळी सुमारे ४० टक्के घटल्याचे उघड झाले. त्यामुळे भूजल पातळी वाढविण्याचे आव्हान असल्याचे भूजलतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या जलयुक्त अभियानातून ही बाब पुढे आली. दरम्यान, काँक्रिटीकरणावर बंधने आणतानाच, जुने ओढे, नाले-बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

पुणे - शहरात पाणीटंचाई असतानाच वाढलेली बांधकामे आणि सिमेंट-काँक्रीटच्या जाळ्यामुळे शहरातील भूजल पातळी सुमारे ४० टक्के घटल्याचे उघड झाले. त्यामुळे भूजल पातळी वाढविण्याचे आव्हान असल्याचे भूजलतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या जलयुक्त अभियानातून ही बाब पुढे आली. दरम्यान, काँक्रिटीकरणावर बंधने आणतानाच, जुने ओढे, नाले-बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

पर्यावरण सप्ताहानिमित्त महापालिकेने जलयुक्त शहर अभियान हाती घेतले आहे. त्याअंतर्गत भूजल पातळीबाबत कार्यशाळा घेतली. त्यात डॉ. विश्राम राजहंस, शशांक देशपांडे, डॉ. हिमांशू कुलकर्णी, विनोद बोधनकर, डॉ. अंजली पारसनीस यांचा सहभाग होता. 

भूजल पातळी, नेमकी वस्तुस्थिती, ती घटण्याची कारणे, त्यावरील उपाय आदी मुद्यांवर चर्चा झाली. तसेच, भूजल पातळी घटल्याने ओढविणारे संकट रोखण्यासाठी नेमक्‍या उपायायोजनांकडे लक्ष देण्याची गरजही व्यक्त झाली. या संदर्भात महापौर मुक्ता टिळक यांनी माहिती दिली. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी उपस्थित होते. 

‘शहराच्या विकासाच्या धोरणामध्ये भूजल व्यवस्थापनाचा विचार झाला नाही. त्याचा परिणाम, भूजल आणि पुनर्भरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे लोकसहभागातून पुनर्भरणाचा प्रयत्न व्हावा. पुनर्भरण बोअरवेल, पुनर्भरण चर, कंपाउंड वॉलच्या बाजूने पाणी जमिनीत मुरविण्यासाठी प्रयत्न करावेत. 

नदी, नाल्यांमधील प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या भूजल प्रदूषणाबाबत कार्यशाळेत चिंता व्यक्त झाली, ’’ असे महापौर टिळक यांनी सांगितले. त्यावर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water level Decrease in Pune City