नीरा नदीवरील बंधाऱ्याच्या पाणी साठ्यामध्ये वाढ

राजकुमार थोरात
शनिवार, 1 डिसेंबर 2018

चालू वर्षी इंदापूर तालुक्यामध्ये दुष्काळी परस्थितीमुळे शेतकरी मेटकुटीस आला आहे. उभी असलेली पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. नीरा नदी काठच्या बंधाऱ्यातील पाणी साठा गेल्या पंधरा-वीस दिवसापूर्वी काही प्रमाणात कमी झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेमध्ये होता.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नीरा नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्यामध्ये वाढ झाल्यामुळे शेतकरी समाधानी झाले आहेत.

चालू वर्षी इंदापूर तालुक्यामध्ये दुष्काळी परस्थितीमुळे शेतकरी मेटकुटीस आला आहे. उभी असलेली पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. नीरा नदी काठच्या बंधाऱ्यातील पाणी साठा गेल्या पंधरा-वीस दिवसापूर्वी काही प्रमाणात कमी झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेमध्ये होता. मात्र गेल्या आठ दिवसापासुन इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील  जांब,कुरवली,चिखली व वालचंदनगर (भाेरकरवाडी)  च्या बंधाऱ्यातील पाणी साठ्यामध्ये वाढ झाल्याने शेतकरी वर्ग खुश झाला आहे. या बंधाऱ्यातील पाणी साठ्याचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहेत.

नदीकाठच्या अनेक गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना नदीच्या पाण्यावरती अवलंबून असल्यामुळे याचाही फायदा होणार आहे.यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्‍यामराव भोसले यांनी सांगितले की, गेल्या दहा- बारा दिवसापूर्वी इंदापूर, बारामती, फलटण,माळशिरस तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.अवकाळी पावसाचे पाणी बारामती,इंदापूर तालुक्यातील बंधाऱ्यामध्ये आले असून ओव्हरफुल झालेले पाणी  बंधाऱ्यामधून वाहुन खालच्या दुसऱ्या बंधाऱ्यात जात आहे.यामुळे इंदापूर तालुक्यातील बंधारे भरले असून निमसाखर,निरवांगीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठ्यामध्ये ही वाढ होत आहे.

पाण्याचा काटकसरीने वापर करा...धोडपकर
चालू वर्षी दुष्काळी परस्थिती असुन शेतकऱ्यांनी नीरा नदीवरील बंधाऱ्यातील पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन  पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी केले आहे.

Web Title: water level increase on Nira river