पंढरपुरात पाणी पातळी सव्वा फुटांनी वाढणार; उजनी भरले

ज्ञानेश्‍वर बिजले 
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

पंढरपूर शहराच्या सखल भागात आज सकाळपासून भीमा नदीच्या पुराचे पाणी शिरू लागले असून, पाण्याची ही पातळी आज रात्रीपर्यंत आणखी एक ते सव्वा फुटांनी वाढणार आहे. पंढरपूर-सोलापूर मार्गावरील नव्या पुलावरून आज दुपारी भीमा नदीच्या पुराचे पाणी वाहू लागले​

पुणे : पंढरपूर शहराच्या सखल भागात आज सकाळपासून भीमा नदीच्या पुराचे पाणी शिरू लागले असून, पाण्याची ही पातळी आज रात्रीपर्यंत आणखी एक ते सव्वा फुटांनी वाढणार आहे. पंढरपूर-सोलापूर मार्गावरील नव्या पुलावरून आज दुपारी भीमा नदीच्या पुराचे पाणी वाहू लागले. 

पंढरपुरातील नदीच्या पाण्याचा विसर्ग दोन लाख 28 हजार क्‍युसेक असून, तो रात्रीपर्यंत दोन लाख 60 हजार क्‍युसेकपर्यंत वाढेल. सध्या पाण्याची पातळी 446.4 मीटर असून, ती 447 मीटरपर्यंत वाढणार आहे. उजनी धरणातून सकाळी एक लाख 70 हजार क्‍युसेक (घनफूट प्रति सेकंद) पाणी सोडण्यात येत होते. सकाळी दहापासून ते दीड लाख क्‍युसेक करण्यात आले, तर दुपारनंतर त्यात आणखी वीस हजार क्‍युसेकने घट करण्यात येणार आहे. वीर धरणातून 78 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. 

नीरा नरसिंगपूर येथे भीमा व नीरा नदीच्या संगमावर पुराच्या पाण्याची पातळी दोन लाख 64 हजार क्‍युसेक आहे. तेथून ते पाणी सुमारे 16 तासांनी पंढरपुरात पोहोचते. उजनीतून पाणी सोडण्याचे प्रमाण कमी करण्यात येत असल्यामुळे, पुराच्या पाण्याची पातळी उद्या गुरुवारी वाढणार नाही. 

उजनी प्रकल्पाचे मुख्य अभियंता विलास राजपूत पूरनियंत्रणाबाबत "ई सकाळ'ला माहिती देताना म्हणाले, "उजनी धरण आज सकाळी 99.5 टक्के भरले. चार ते सहा ऑगस्ट या तीन दिवसांत उजनीमध्ये पाणीसाठ्यात 35 अब्ज घनफूट (टीएमसी) वाढ झाली. ते लक्षात घेऊन आम्ही आधीपासूनच धरणातून एक लाख क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरवात केली. पंढरपूर शहरात जास्त पाणी शिरू नये, याची काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठी विभागीय आयुक्तांसह सर्व शासकीय यंत्रणांना तीन-चार दिवसांपासून पूर्वकल्पना दिल्याने, तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.'' 

"पुण्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे, येत्या एक-दोन दिवसांत धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी असेल. तरीदेखील उजनीतून किमान एक लाख क्‍युसेक पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे, धरणसाठ्यात अचानक वाढ होणाऱ्या पुराच्या पाण्याला धरणाच्या जलाशयात सामावून घेण्यासाठी जागा शिल्लक राहील,'' असे त्यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The water level in Pandharpur will increase