वन्यजीवांच्या पाण्यासाठी सर्पमित्रांकडून टँकरची सोय 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

वरवंड : उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन कडेठाण (ता. दौंड) येथील दोन सर्पमित्रांनी वन्यजीवांसाठी देऊळगावगाडा वनक्षेत्रातील पाणवठ्यात टॅंकरद्वारे सात हजार लिटर पाणी सोडल्याने प्राण्यांची भटकंती थांबण्यास मदत होणार आहे. 

वरवंड : उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन कडेठाण (ता. दौंड) येथील दोन सर्पमित्रांनी वन्यजीवांसाठी देऊळगावगाडा वनक्षेत्रातील पाणवठ्यात टॅंकरद्वारे सात हजार लिटर पाणी सोडल्याने प्राण्यांची भटकंती थांबण्यास मदत होणार आहे. 

देऊळगावगाडा येथील वनक्षेत्रात हरीण, ससे, लांडगा, कोल्हा, मोर, सरपटणारे प्राणी, पक्षी यांचा वावर आहे. येथे 'सकाळ'च्या पाठपुराव्याने वन विभागाने जिल्ह्यातील एक मॉडेल म्हणून बशीच्या आकाराचे दोन पाणवठे तयार केले आहेत. दोन्हींची एकूण तब्बल छत्तीस हजार लिटर पाणी साठवण क्षमता आहे. उन्हाळ्याच्या सुरवातीला पाणवठे कोरडे पडल्यामुळे वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याची बातमी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली. त्याची दखल घेऊन अनेक दानशूरांनी वन्यजीवांसाठी मदतीचा हात पुढे करण्यास सुरवात केली. डॉक्‍टर, माजी वन कर्मचारी, माजी विद्यार्थी आदींसह अनेकांनी पाणवठ्यात पाणी सोडले आहे. 

दौंड येथील सर्प जीवन संस्थेचे कडेठाण येथील लक्ष्मण कुंजीर व भीमराव रणधीर या दोन सर्पमित्रांनीही वन्यजीवांसाठी हात पुढे केला त्यांनी 'सकाळ'चे बातमीदार अमर परदेशी यांच्या माध्यमातून वन अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पाणी सोडण्याचे नियोजन केले. त्यानुसार शुक्रवारी (ता. 27) दुपारी त्यांनी पाणवठ्यात तब्बल सात हजार लिटर पाणी सोडले. त्या वेळी वन अधिकारी अशोक पवार उपस्थित होते.

Web Title: Water made available for animals in Daund