इंदापूर तालुक्यातील सर्व पाणी प्रश्‍न सोडविणार - अजित पवार

Ajit-Pawar
Ajit-Pawar

इंदापूर - ‘नीरा डावा कालव्याच्या पाण्यास भाजप सरकारने बुच मारले होते. मात्र, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय रद्द करून न्यायालय पातळीवर टिकेल, असा निर्णय घेतला आहे. लाकडी- निंबोडी पाणी पुरवठा योजना पूर्ण करूनच पुढील विधानसभा निवडणुकीत मत मागण्यास इंदापूर तालुक्यात येणार आहे. तालुक्याचे पाण्यासह सर्व प्रश्न सोडविले जातील,’’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इंदापूर विभागीय कार्यालय व नूतन शाखेचे उद्घाटन व इंदापूर नगरपरिषद हद्दीतील ३३ कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘कर्नाटकला जाणारे पाणी अडवून मदनवाडी ते तरंगवाडीपर्यंत तलाव भरता येतील, अशी व्यवस्था केली जाईल. २२ गावांचा बारमाही प्रश्न, नीरा डावा कालवा अस्तरीकरण, वहनक्षमता वाढविणे, लाकडी- निंबोडी पाणी पुरवठा योजना मार्गी लावणे, शेटफळ हवेली तलाव उंची वाढविणे व सांडव्याची कामे, उजनी धरणातून शेटफळगढे येथील खडकवासला कालव्यात पाणी आणून ते तालुक्यात फिरविणे, या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे, मंत्री दत्तात्रेय भरणे व आपण स्वतः काम करत आहे.’’ 

सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे अध्यक्षस्थानी होते. या वेळी आमदार यशवंत माने, प्रदीप गारटकर, वैशाली नागवडे, वैशाली पाटील, दशरथ माने, राजेंद्र तांबिले,अरविंद वाघ, प्रवीण माने,अभिजित तांबिले, सचिन सपकळ, महारुद्र पाटील, धनंजय बाब्रस, विठ्ठल ननवरे, छाया पडसळकर, बाळासाहेब ढवळे, पोपट शिंदे, नगरसेवक अनिकेत वाघ, अमर गाडे, प्रशांत सिताप, हेमलता मालुंजकर, राजश्री मखरे, हनुमंत कोकाटे, अतुल झगडे, वसंत आरडे, दिलीप वाघमारे, दत्तात्रेय फडतरे, शिवाजीराव इजगुडे आदी उपस्थित होते. या वेळी सनदी लेखापाल लक्ष्मीकांत नगरे, यूपीएससी उत्तीर्ण पृथ्वीराज शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

अजित पवार म्हणाले, ‘राज्याचे मंत्रिमंडळ तीन पक्षाचे असून, महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली. मंत्रिमंडळात नवखे असूनसुद्धा काम करण्याचा त्यांचा पाठपुरावा चांगला असून, त्यांना जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांची साथ मिळत आहे. त्यामुळे येत्या नगरपरिषद, पंचायत समिती, इतर निवडणुकीत राष्ट्रवादीकडे सत्ता द्या. तालुक्याचे पाण्यासह सर्व प्रश्न सोडविले जातील, हा शब्द आहे.’’

दत्तात्रेय भरणे म्हणाले, ‘जनतेने आमदार केल्यानंतर नेते शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी मला मंत्री केले. मिळालेले पद सेवेसाठी वापरत कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. महिलांचा डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी ८० कोटी रुपयांचा आराखडा केला. त्यामुळे रोज उद्घाटन म्हटले, तरी वर्षाचे दिवस कमी पडतील. तालुक्याचा पाणी व इतर प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे.’’

प्रदिप गारटकर म्हणाले, ‘आमच्याकडे नगर परिषद असताना आम्ही सत्तेच्या विरोधात होतो, मात्र राज्यात आता आमची सत्ता असून नगराध्यक्ष आमचा नसतानादेखील आम्ही ३३ कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी इतिहासात प्रथम आणला आहे. त्यातून वाढीव हद्दीत पायाभूत सुविधा देवून शहर विकासाचे स्वप्न पूर्ण करणार आहे. बारामती खालोखाल इंदापूरचा विकास करण्यास कटिबद्ध आहे.’ सूत्रसंचालन अनिल रूपनवर यांनी केले.   

शेतकरी हा लाखांचा पोशिंदा आहे. मात्र, शेतीमालास किफायतशीर दर मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खासदारांनासुद्धा भेटू दिले जात नाही, ही लोकशाहीतील ठोकशाही  आहे. 
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे

  • निमगाव केतकीची ग्रामपंचायत आली. मात्र, शरद पवारसाहेबांच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस बसणाऱ्याने वालचंदनगर ग्रामपंचायत घालवली. त्यांची गय केली जाणार नाही, असा सूचक इशारा दिला.
  • राष्ट्रवादी काँग्रेसमुळे पदे मिळाली, मात्र पक्षनिष्ठ न राहणाऱ्या जित्राबांना पक्षात घेतले जाणार नाही. ते जिकडे गेले; तिथे सत्ता गेली, हा पायगुण आहे, अशी टीका अप्पासाहेब जगदाळे यांच्यावर केली.
  • स्वार्थासाठी भाजपात गेलेल्या विरोधकांना आपल्या संस्थादेखील नीट चालवता येत नाही. नुसते जॅकेट घालून चालत नाही; तर जमिनीवर राहून काम करावे लागते, असा उपरोधिक सल्ला हर्षवर्धन पाटील यांना देऊन राजकीय हाडवैर असल्याचे दाखवून दिले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com