अवसरी खुर्दला पाण्यासाठी पायपीट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

मंचर - अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) गावाच्या पश्‍चिम व दक्षिण बाजूने उजवा कालवा पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. ओढ्यातूनही पाणी वाहत आहे; पण गावाला तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा नळाद्वारे केला जातो. धरण उशाला अन्‌ कोरड घशाला, अशी येथील गावकऱ्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे.

मंचर - अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) गावाच्या पश्‍चिम व दक्षिण बाजूने उजवा कालवा पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. ओढ्यातूनही पाणी वाहत आहे; पण गावाला तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा नळाद्वारे केला जातो. धरण उशाला अन्‌ कोरड घशाला, अशी येथील गावकऱ्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे.

गावाच्या लोकसंख्येत गेल्या पाच वर्षांत वाढ झाली आहे. येथे शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील निवासी राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत पाण्याची टाकी अपूर्ण पडत आहे. गावाचा विस्तारही वाढत चालला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. 

दर वर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सध्या तर गावाच्या सभोवती मुबलक पाणी आहे. ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थित नियोजन करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

दरम्यान, बुधवारी (ता. १६) व गुरुवारी (ता. १७) पाच ते सात तास वीजपुरवठा विस्कळित झाला होता. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. येथे दोन लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीची गरज आहे. सध्या एक लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. पाझर तलावात साठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सार्वजनिक विहिरीत तलावातील पाणी सोडले जाते. विहीर दोन तासांत रिकामी होते. यातून मार्ग काढण्यासाठी सार्वजनिक विहिरीच्या जवळच असलेल्या शिंदे मळ्याच्या विहिरीचे पाणी सार्वजनिक विहिरीत सोडण्याचे काम सुरू झाले आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी व सदस्य पाण्याचे व्यवस्थित नियोजन करत आहेत. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

टाकी बांधल्यानंतर दररोज नळाद्वारे पाणी 
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे नवीन पाण्याच्या टाकीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत टाकीचे बांधकाम सुरू होणार आहे. टाकीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नळाद्वारे दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती सरपंच सुनीता प्रसाद कराळे व उपसरपंच अनिल शिंदे यांनी दिली.

Web Title: water shortage in avasari khurd