पिंपरी चिंचवडमध्ये पाणीकपात वाढणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

नागरिकांसाठी सूचना
  शौचालयात फ्लशऐवजी मगचा वापर करावा
  मगचा वापर केल्याने प्रतिमाणशी दररोज १४ लिटर पाणीबचत
  नळ सुरू ठेवून भांडी धुऊ नयेत
  स्वयंपाकानंतरचे पाणी झाडांना वापरावे
  पिण्याच्या पाण्याने गाड्या धुऊ नयेत

पिंपरी - वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वाढल्याने पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे १५ जुलैऐवजी १५ जूनपर्यंतच पाणी पुरेल अशी स्थिती आहे. तसेच पाण्याची काटकसर, पुनर्वापर, गळती याकडे नागरिकांकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याने पुढील महिन्यात आणखी पाणीकपात होण्याची शक्‍यता आहे.

पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून दररोज ४४० दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्यास जलसंपदा विभागाने महापालिकेला परवानगी दिली आहे. मात्र, वाढती लोकसंख्या व उन्हाळ्यामुळे एवढे पाणी पुरेसे नाही. शहरातील पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिका दररोज ४७५ ते ४८० दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपसा करते. उन्हाळा व अनधिकृत बांधकामांमुळे पाण्याची मागणी वाढली आहे. 

वस्तुस्थिती
सामान्यपणे धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरेल या हिशेबाने नियोजन केले जाते. मात्र, पाण्याचा वाढता वापर आणि वेगाने होणारे बाष्पीभवन यामुळे १५ जूनपर्यंतच पाणी पुरेल अशी स्थिती आहे. परिणामी, सध्या सुरू असलेल्या आठवड्यातील एक दिवस पाणीकपातीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. याबाबत पुढील महिन्यात निर्णय होण्याची शक्‍यता असून, शहरवासीयांना आणखी पाणीकपात सहन करावी लागणार आहे.
 
पाणीकपात निरुपयोगी
गतवर्षीच्या तुलनेत धरणात पाणीसाठा कमी असल्याने महापालिकेने एक मार्चपासून दहा टक्के पाणीकपात लागू केली. त्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागांत आठवड्यातून पाणी बंद ठेवले जात आहे. दररोज दहा टक्के म्हणजेच सुमारे ४८ ते ४९ दशलक्ष घनमीटर पाणीबचत होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ २० दशलक्ष घनमीटर पाण्याचीच बचत होत आहे. त्यामुळे या कपातीचा विशेष फायदा झाला नसल्याचे दिसते. या संदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की आठवड्याचे सहा दिवस नागरिक भरपूर पाणी वापरतात. ज्या दिवशी पाणी बंद असते, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या-त्या भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येतो. नागरिकांनी दररोज पाण्याच्या वापरात बचत केल्यास ४८ ते ४९ दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत शक्‍य आहे.

गळती व उपाययोजना
सध्या गळतीचे प्रमाण ४० टक्के आहे. लोखंडी जीआय पाइप दर सात-आठ वर्षांनी गंजतात. त्यामुळे ते बदलावे लागतात. त्यासाठी अत्याधुनिक एमडीपी पाइप (मॉडरेट डेन्सिटी पॉलिइथिलीन पाइप) बसविण्यात येत आहेत. त्यासह स्काडा योजना अद्ययावत करणे, नवीन टाक्‍या बांधणे यासाठी जेएनएनयूआरएम अंतर्गत १५० कोटी आणि अमृत योजनेतून २४४ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. जेएनएनयूआरएमचे काम वर्षभरात, तर अमृत योजनेचे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. देहू बंधाऱ्यातून दररोज दशलक्ष घनमीटर पाणी उचलून ते चिखली येथील टाकीत सोडण्यात येणार आहे. चिखली येथे टाकी बांधण्याच्या कामाची निविदा आचारसंहितेनंतर काढण्यात येणार आहे.

लोकसंख्येचा परिणाम
२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १७ लाख ५० हजार होती. महापालिकेकडे उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांतच शहराच्या लोकसंख्येत सव्वासहा लाखांनी भर पडली आहे. त्यामुळे ही लोकसंख्या २७ लाख ५० हजारांवर गेली आहे. पाण्याचा वापर प्रतिव्यक्ती १३५ लिटर याप्रमाणे आहे. तसेच दीड लाख लोकसंख्या कमी-जास्त (फ्लोटिंग) असते. त्यामुळे एकूण लोकसंख्या २९ लाख होते. सव्वालाख लोकसंख्येसाठी एकूण १२५ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. मात्र महापालिकेकडून धरणातून ३० ते ४० दशलक्ष घनमीटर पाणी वापरले जात आहे.

Web Title: Water Shortage Increase in Pimpri Chinchwad Pawana Dam