खामगाव मावळातील यात्रा पाण्याविना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

खामगाव मावळातील सार्वजनिक विहिरीचे पाणी आटले आहे. त्यामुळे ग्रामस्थ तहानले आहेत. गुढीपाडव्याला श्री आम्रीनाथ व श्री कोठरजाई देवाची यात्राही पाण्याविनाच साजरी झाली. गाव सध्या टॅंकरच्या पाण्यावरच अवलंबून आहे.

खडकवासला - खामगाव मावळातील सार्वजनिक विहिरीचे पाणी आटले आहे. त्यामुळे ग्रामस्थ तहानले आहेत. गुढीपाडव्याला श्री आम्रीनाथ व श्री कोठरजाई देवाची यात्राही पाण्याविनाच साजरी झाली. गाव सध्या टॅंकरच्या पाण्यावरच अवलंबून आहे. 

काकडे वस्तीतील सार्वजनिक विहिरीवर मोटार बसवून पाणी पुरविले जाते. त्या विहिरीतील पाणी फेब्रुवारीत आटले. यामुळे गावठाणात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. लोकसंख्या १४५१ आहे. आता टॅंकरने पाणीपुरवठा होतो. दिवसाला टॅंकरच्या तीन खेपा होतात. सुमारे २९ हजार लिटर पाणी दिवसा लागते. 

ग्रामस्थ किसन दुधाणे म्हणाले, की खासगी विहिरीतील पाण्याचा उपसा जास्त झाला. त्यामुळे सार्वजनिक विहिरीचे पाणी आटले. गणेशोत्सवानंतर पाऊस झाला नाही. त्याचाही परिणामही झाला. 

तीन एप्रिलला संध्याकाळी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याच्या पत्रावर प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी सही केली. पण, यात्रेला टॅंकर आला नाही. दरम्यान, १२ टॅंकरने पाणी पुरविले, अशी माहिती सरपंच सतीश नवघणे यांनी दिली.

प्रांत कार्यालयाने पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर मंजूर केला आहे. टॅंकरने देणारी एजन्सी इंदापूर येथील आहे. तेथील टॅंकर पुण्यात येऊन जीपीएस यंत्रणा बसविली जाईल. त्यानंतर उद्या पाणीपुरवठा सुरू होईल. 
- डॉ. तानाजी लोखंडे, गटविकास अधिकारी 

Web Title: Water Shortage Khamgav maval Yatra