‘एमआयडीसी’मुळे पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पिंपरी - गेल्या आठ दिवसांपासून शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र एमआयडीसीच्या जलवाहिनीतून गळती झाल्यामुळे रावेत बंधाऱ्यातून पुरेसे पाणी उचलू न शकल्यामुळे पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बोपखेल, दिघी, चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, भोसरी, पिंपळे गुरव, नवी सांगवी आदी भागांत आठ दिवसांपासून पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

त्याबाबत काही नागरिकांनी संबंधित भागातील नगरसेवकांकडे धाव घेतली, तर नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. 
अधिकाऱ्यांनी सांगितले, की पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून रोज ४८४ एमएलटी पाणी उचलतो. मात्र गेल्या आठवड्यात हे प्रमाण सरासरी ४६० एमएलटीवर आले आहे. 

याबाबत पाटबंधारे विभागाला विचारले असता, पवना धरणातून महापालिकेच्या ठरलेल्या कोट्यानुसार पाणी सोडले जात आहे. मात्र रावेत बंधारा येथून एमआयडीसीही पाणी उचलत आहे. त्यांच्या जलवाहिनीतून गळती होत असल्याने पाणी कमी मिळाले. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जलवाहिनी दुरुस्त केली आहे. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल.

पाणीपुरवठा नियोजन
शहरातील सर्व भागांत समान पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने शहराचे विभाजन सात भागांत केले होते. त्यानुसार आठवड्याचे शेड्यूल्ड आखून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले होते. रोज एका भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव होता. त्यासंदर्भात महापालिकेतील गटनेत्यांसमवेत गेल्या आठवड्यात बैठक झाली. मात्र सदर प्रस्तावाची अंमलबजावणी पुढे ढकलावी, असे गटनेत्यांनी सुचविले आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले. 

‘अभ्यास करून निर्णय घ्या’
शहरात भेडसावणारा पाण्याचा प्रश्‍न, पाण्याची मागणी व पाणीपुरवठ्याचे नियोजन याचा अभ्यास करून निर्णय घ्या. एखाद्या भागातील पाणीपुरवठा वारंवार बंद राहणार नाही, सर्वांना समान पाणी मिळेल, असे नियोजन करावे, असा आदेश अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. 

आज, उद्या समस्या
महापालिकेतर्फे रावेत पंपिंग स्टेशन व पाणीपुरवठा विभागाच्या अन्य भागांतील देखभाल, दुरुस्तीची कामे गुरुवारी (ता. १३) केली जाणार आहेत. त्यामुळे शहराच्या सर्व भागांतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. तसेच जलवाहिन्या दुरुस्तीसाठी एमआयडीसीनेही गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम शहरातील नागरिकांवर होणार असून, आणखी दोन दिवस पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

Web Title: Water Shortage by MIDC