ऐन गणेशोत्सवात पिंपरीत पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

शहरातील पाणीपुरवठ्याचा तिढा अद्याप सुटला नसून, ऐन गणेशोत्सवात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळित असून, पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

पिंपरी - शहरातील पाणीपुरवठ्याचा तिढा अद्याप सुटला नसून, ऐन गणेशोत्सवात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळित असून, पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

गणेशोत्सवापूर्वी आकुर्डी-गंगानगर परिसरातील महिलांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. मात्र, अद्यापही स्थिती बदललेली नाही. 

गंगानगर येथील प्रमोद चव्हाण म्हणाले, ‘‘आमच्या भागात दिवसभरात फक्‍त अडीच तास पाणी येते. पुरेसा दाब नसल्याने पाण्याच्या टाक्‍या भरत नाहीत. त्यामुळे गैरसोय होते.’’ 

विनोद चव्हाण म्हणाले, ‘‘कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी पाण्याच्या मीटरची तपासणी केली. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे.’’  

काळेवाडी येथील अजय वाणी यांनीदेखील पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याचे सांगितले.दरम्यान, कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारींत घट झाली आहे. आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत निर्णयाची अंमलबजावणी होण्यापूर्वी शहराच्या २५ टक्के भागातून कमी दाबाने पाणीपुरवठ्याबद्दलच्या तक्रारी होत्या. आता हे प्रमाण पाच टक्‍क्‍यांवर आल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Shortage in Pimpri in Ganeshotsav Festival