पुणेकरांना पाण्याचा ‘धडा’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

पाणी येते, पण ते अत्यंत कमी दाबाने असते. त्यामुळे दिवसभरासाठीचा जेमतेम साठाही करता येत नाही. बैठी घरे, वाड्यांमध्ये पहाटे पाच वाजता आलेले पाणी दोन ते तीन तासच असते. अनेक सोसायट्यांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे महिला वर्गाचे हाल होत आहेत.  
- सचिन देशमुख, कसबा पेठ

पुणे - जूनअखेरपर्यंत पाणीकपात होणार नसल्याची घोषणा पालकमंत्री करीत असताना, दुसरीकडे मात्र पेठांसह उपनगरांतील रहिवाशांचे अपुऱ्या पाणीपुरवठ्याने ‘पाणी-पाणी’ होत आहे. असे असूनही पुरेसे पाणी पुरविले जात असल्याचा दावा करीत महापालिका एक प्रकारे पुणेकरांना पाण्याचा ‘धडा’ देत असल्याची सद्यःस्थिती आहे. प्रत्यक्षात लोकांना पाणी कमी मिळण्यामागे हात कोणाचा, हा प्रश्‍न गुलदस्ताततच आहे.  

सध्या पेठांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे. तर, उपनगरांत म्हणजे कात्रज, बालाजीनगर, धनकवडी परिसरात पाणीकपात असल्याचे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे, अशा प्रकारे पाणीकपात नसून, पाणीपुरवठा सुरळीत असल्याचे अधिकारी सांगत आहेत.

तांत्रिक कारणांमुळे काही भागांत कमी-अधिक प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही पाणीकपात आहे, की क्षेत्रीय कार्यालयांतील कर्मचारी-व्हॉल्व्हमनने केलेला ‘उद्योग’ हे कळू शकले नाही. 
सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याची गाऱ्हाणे नगरेसवकांनी महापालिकेच्या सोमवारच्या सर्वसाधारण सभेत मांडली. त्यावेळी वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा होत आहे, असे या खात्याचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आज कोंढवा, कात्रज, बालाजीनगर, धनकवडीत पाणी न आल्याने रहिवाशांची विशेषत: महिलांची धावपळ उडाली. कसबा पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ आणि शनिवार पेठेतही कमी दाबाने पाणी आल्याच्या तक्रारी लोकांनी केल्या.  

धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने कपात होण्याची शक्‍यता होती. मात्र ३० जूनपर्यंत पाणीकपात राहणार नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात गेल्या चार दिवसांपासून लोकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही अघोषित कपात लादण्यात आली आहे, की तांत्रिक दोष हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Shortage Water Supply Less