पानी फाउंडेशनमुळे बारामती तालुक्यात जलचळवळ

WhatsApp-Image-2018-08-05-a.jpg
WhatsApp-Image-2018-08-05-a.jpg

उंडवडी :  "पानी फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती तालुक्यात जल चळवळ उभी राहिली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील दुष्काळी गावात  जलसंधारणाबरोबरचं मनसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. पुढील वर्षीचे नियोजन यावर्षी केले तर अजून चांगले काम पुढे होईल. यासाठी यापुढेही गावागावातील लोकांनी संघटीत होवून चांगली कामे करुन राज्यपातळीवर बक्षिस मिळवण्यासाठी प्रयत्न करावा." असे आवाहन  डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी बारामती येथे केले. 
बारामती येथील जिजाऊ भवन सभागृहात  'पानी फाउंडेशन'च्या वतीने "गौरव जलरत्नांचा" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सौ. सुनंदा पवार बोलत होत्या. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे, बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले,  उपसभापती शारदा खराडे, प्रांताधिकारी हेमंत निकम , तहसिलदार हनुमंत पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, कुलभूषण कोकरे, पानी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक आबासाहेब लाड, ज्योती सुर्वे, तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड, मयुर साळुंखे आदींसह गावागावातील सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ. पवार पुढे म्हणाल्या,  यंदा तालुक्यात पानी फाउंडेशनच्या माध्यमातून मृद व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. मात्र अद्याप दमदार पाऊस झालेला नाही.  येत्या काही दिवसात पाऊस निश्चित पडेल,  अशी अपेक्षा आहे. येत्या काळात निवडणूका येतील आणि जातील, याचा परिणाम जलसंधारण आणि मनसंधारणाच्या कामात होवू देवू नका. यापुढे असाच एकोपा कायम ठेवून जलसंधारणाच्या कामाची गती वाढवा. " 

प्रांताधिकारी हेमंत निकम म्हणाले, " तालुक्यातील सोळा गावात मृद व जलसंधारणाची कामे डेव्हलपमेंट ट्रस्ट, एन्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, भारतीय जैन संघटना, सकाळ रिलीफ फंड व शरयू फाउंडेशनने मोठी मदत केली. पानी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत सुरवातीला 35 गावांनी  नाव नोंदणी केली  होती. मात्र प्रत्यक्षात 17 गावानीचं  सहभाग घेतला. बारामती तालुक्यात 28 लाख 75  हजार घनमीटर मृद व जलसंधारणाचे काम मशिनच्या साह्याने झाले आहे. तर मनुष्यबळाने श्रमदानातून 83 हजार 400 घनमीटर काम झाले आहे. 

पानी फाउंडेशनमुळे अनेक ठिकाणी भांडणे मिटून लोक एकत्र आली आहेत. तालुक्यातील एकातरी गावाला राज्यपातळीवरील बक्षिस मिळेल, अशी अपेक्षा आहे. पानी फाउंडेशनचे काम आजही न थांबवता गावानी आपली लढाई सुरु ठेवावी. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाण्याचे टॅंकर कमी झाले असून यावर्षी फक्त तीन टॅंकर सुरु आहेत. गावानी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर मागणे, ही चांगली बाब नाही.त्यामुळे येत्या काळात देखील जलयुक्त शिवार अभियानमध्येही गावानी चांगली कामे केली पाहिजेत. कोणत्याही गावाने सरकारच्या निधीवर बसू नये. यापुढे दुष्काळमुक्तीसाठी एकोप्याने कामे करावीत.  म्हणजे खऱ्या अर्थाने भविष्यात टंचाईग्रस्त गावे पाणीदार होण्यास मदत होईल. "  

या कार्यक्रमाच्या सुरवातीला अभिनेते अमीरखान यांची स्क्रिनवर पानी फाउंडेशनबाबत प्रतिक्रिया दाखवण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी प्रमोद काळे, तसेच निवडक शेतकरी, ग्रामसेवक व कार्यकर्त्यानी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमात अंजनगाव, गाडीखेल, जळगाव सुपे, कन्हेरी, कऱ्हावागज, कटफळ, खराडेवाडी, मुर्टी, पळशी, पानसरेवाडी,  सावंतवाडी, सोनवडी सुपे, सिध्देश्वर निंबोडी, उंडवडी सुपे या चौदा गावातील गावकऱ्यांचा  मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र व रोप देवून सन्मान  करण्यात आला. तसेच पानी फाउंडेशनमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामसेवक, जलमित्र, पत्रकार,  अधिकारी, पदाधिकारी व पानी फाउंडेशनचे तालुका टिम व प्रशिक्षक यांचाही सन्मान पत्र देवून  गुण गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता कुलकर्णी प्रास्ताविक पृथ्वीराज लाड तर आभार मयुर साळुंखे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com