संपाच्या काळातही शहरातील पाणीपुरवठा सुरळीत

संपाच्या काळातही शहरातील पाणीपुरवठा सुरळीत

पिंपरी - महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीचे (महानिर्मिती) अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. ७) संप पुकारला. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार होता. मात्र, जलसंपदा विभागाने चारशे क्‍युसेक वेगाने १८ तास पवना नदीत पाणी सोडल्याने सोमवारी (ता. ७) सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत राहिला. दरम्यान, ‘महानिर्मिती’कडून रविवारी रात्री दोन तास जादा पाणी मिळाल्याने मंगळवारी (ता. ८) सकाळ आणि सायंकाळचाही पाणीपुरवठा सुरळीत राहणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  

महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या संपामुळे शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणाजवळील पवना जलविद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री दोन तास जादा काम करून वीजनिर्मितीनंतर पवना नदीत पाणी सोडले. दोन तासात साधारणतः २४०० क्‍युसेक पाणी मिळाले. तसेच, जलसंपदा विभागाकडून ताशी ४०० क्‍युसेकप्रमाणे १८ तास पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अशुद्ध जलउपसा केल्या जाणाऱ्या रावेत बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला असून शहराला पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने  केले आहे. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे म्हणाले, ‘‘पवना जलविद्युत केंद्रातील महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन तास जादा पाणी सोडले आहे. तसेच, जलसंपदा विभागातर्फे धरणातून चारशे क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सोमवारी पाणीपुरवठ्यावर काहीही परिणाम झाला नाही. मंगळवारचा पाणीपुरवठाही सुरळीत राहील.’’ 

महानिर्मितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता. ७) पहाटे पाच वाजेपासून चारशे क्‍युसेकप्रमाणे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. अठरा तास विसर्ग सुरू राहणार असल्याने पिंपरी-चिंचवड व अन्य गावांना पुरेसे पाणी मिळेल. पाणी कमी पडल्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्या प्रमाणात पाणी सोडले जाईल.
- अशोक शेठे, उपअभियंता, पवना धरण, जलसंपदा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com