पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआडच होणार पाणीपुरवठा?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे केवळ दहा टक्के नागरिकांच्या तक्रारी राहिल्या आहेत. त्या नळजोड, पाइप चोकअप अशा स्वरूपाच्या आहेत. त्यांचे तत्काळ निवारण केले जात आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्याबाबत दोन दिवसांनी आढावा बैठक होऊन पुढील निर्णय घेतला जाईल.
- मकरंद निकम, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

पिंपरी - ‘आता पुरेसे पाणी मिळतंय’, ‘आम्ही साठा करून ठेवतोय’, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. पाण्याबाबतच्या ९० टक्के तक्रारी कमी झाल्या आहेत, असा दावा महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी करीत आहेत. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी घेतलेला दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय कायम राहण्याची शक्‍यता आहे. या बाबतची आढावा बैठक दोन दिवसांनी होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘आमच्या भागात पुरेसे पाणी मिळत नाही’, ‘नळाला कमी दाबाने पाणी येतंय’, ‘अनियमितपणे पाणी येतंय’, अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या. शहराच्या सर्वच भागात पाण्याची ओरड होती. ‘चोरी व गळतीचे प्रमाण ४० टक्के असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही,’ ‘केंद्र सरकारच्या ‘अमृत’ व ‘२४ बाय सात’ योजनेतून नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. नवीन नळजोड दिले जात आहेत. अनधिकृत आढळलेले पंधरा हजारांवर नळजोड अधिकृत केले आहेत,’ असे अधिकारी सांगत होते. मात्र, पाण्याबाबत तक्रारी वाढल्या. त्यामुळे सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन २५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि नागरिकांच्या तक्रारीही कमी झाल्या.

घटस्फोट देत नाही म्हणून पतीचा पत्नीला घराबाहेर काढण्याचा कट

अशी होती योजना
दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाबाबत जास्त वेळ जास्त दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याने सर्वांना समान पातळीवर व पुरेसे पाणी मिळत आहे. दोन दिवस पाणी पुरेल, इतका साठा नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. 

असा होता निर्णय
समान पाणी वितरण धोरणानुसार महापालिकेकडून दिवसाआड पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी २५ नोव्हेंबरपासून सुरू केली. दोन महिन्यांनी आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यानुसार शनिवारी (ता. २५) दिवसाआडच्या अंमलबजावणीस दोन महिने पूर्ण होत आहेत.

अशा आहेत तक्रारी
पाणी वाया जातेय : दत्तनगर, विद्यानगर भागात दहा-दहा तास नळाला पाणी असते. त्यामुळे पाणी वाया जात आहे. पाण्याची वेळ कमी केली पाहिजे, असे एका नागरिकाने सांगितले.

गढूळ पाणी येतेय : सांगवीतील अभिनवनगर, मुळानगर भागात जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. काहींचे नळ तुटले आहेत. त्यामुळे काही नळांना गढूळ पाणी येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water supply issue in Pimpri-Chinchwad city