खेडसाठी अखेर टॅंकर मंजूर

महेंद्र शिंदे
शनिवार, 19 मे 2018

कडूस - टॅंकरने पाणीपुरवठा करावा, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून शासनदारी हेलपाटे मारणाऱ्या खेड तालुक्‍यातील १२ गावांमधील तहानलेल्या ४९ वाड्यावस्त्यांतील नागरिकांच्या संघर्षाला अखेर ‘सकाळ’च्या पाठपुराव्यामुळे यश आले. तालुक्‍यातील दहा गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याच्या मंजुरीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांनी दिली.

कडूस - टॅंकरने पाणीपुरवठा करावा, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून शासनदारी हेलपाटे मारणाऱ्या खेड तालुक्‍यातील १२ गावांमधील तहानलेल्या ४९ वाड्यावस्त्यांतील नागरिकांच्या संघर्षाला अखेर ‘सकाळ’च्या पाठपुराव्यामुळे यश आले. तालुक्‍यातील दहा गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याच्या मंजुरीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांनी दिली.

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने टॅंकरने पाणीपुरवठा करावा, अशा मागणीचे तालुक्‍यातील बारा ग्रामपंचायतींनी चौदा प्रस्ताव पंचायत समितीकडे दिले होते. मार्च महिन्यापासून हे प्रस्ताव येण्यास सुरवात झाली होती. परंतु, प्रशासनाच्या वेळखाऊ व जिल्हा टॅंकरमुक्त असल्याचे दर्शविण्याच्या हेकेखोर धोरणामुळे हे टॅंकर मागणीचे प्रस्ताव प्रशासनाने दीड महिने दाबून ठेवले होते.

मे महिना उजाडला तरी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याबाबत शासकीय स्तरावर काहीच हालचाल होत नव्हती. याबाबतचे वृत्त रविवारी (ता. ६) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि धूळ खात पडलेले हे प्रस्ताव चारच दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयातही वेळकाढूपणा करण्यात आला. तेथेही हे प्रस्ताव आठ ते दहा दिवस मंजुरीविना पडून राहिले. या कार्यालयातही ‘सकाळ’ व टंचाईग्रस्त नागरिकांनी दररोज पाठपुरावा केला. त्यानंतर अखेर गुरुवारी तालुक्‍यातील बारा गावांच्या चौदापैकी दहा गावांच्या बारा प्रस्तावाअंतर्गत ४९ वाड्यावस्त्यातील सुमारे साडेअकरा हजार नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याच्या मंजुरी आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून निघाले. 

यात वाडा, वाशेरे, दोंदे, साबुर्डी, वरुडे, कनेरसर, कोयाळी तर्फे वाडा, आंभू, कुरकुंडी, टेकवडी या गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी सरकारने पाच टॅंकरची तजवीज केली आहे. त्यातील दोन शासकीय; तर तीन टॅंकर अजितदादा सहकारी मोटार वाहतूक संस्थेचे आहेत. त्यातील दोन टॅंकरने काम सुरू झाले आहे. या टॅंकरच्या मदतीने वाशेरे, साबुर्डी, वरुडे व कोयाळी तर्फे वाडा या चार गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. १८) हे टॅंकर पाणी घेऊन रवाना झाल्याची माहिती खेड पंचायत समितीचे रमेश भोगावडे यांनी दिली.

‘सकाळ’चे नागरिकांनी मानले आभार
टॅंकर कधी सुरू होणार, याबाबत दररोज पंचायत समितीत येऊन विचारणा करीत होतो. पण, दाद मिळत नव्हती. पंचायत समितीसमोर आंदोलनाची तयारी पण केली होती. पण, ‘सकाळ’ने आमची दखल घेतली. ‘सकाळ’च्या दणक्‍यानंतर टॅंकर मागणीचे प्रस्ताव वेगाने पुढे सरकले अन्‌ पुढच्या दहाच दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याला मंजुरीसुद्धा मिळाली. ‘सकाळ’मुळेच टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला, अशी प्रतिक्रिया देत वाशेऱ्याचे माजी सरपंच उल्हास कुडेकर यांनी देत टंचाईग्रस्त नागरिकांच्या वतीने ‘सकाळ’चे आभार मानले.

Web Title: water tanker sanction to khed