सोसायट्या टॅंकरच्या चक्रात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

महापालिकेकडून पाणीपुरवठा नसल्याने टंचाई
पिंपरी - नवीन विकसित झालेल्या परिसराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सोसायट्यांना सर्वाधिक टंचाई सहन करावी लागत आहे. त्यामुळे टॅंकरचा व्यवसाय तेजीत आला आहे. दरवर्षी उद्‌भवणाऱ्या या समस्येमुळे सोसायटीधारक हैराण झाले आहेत. गेल्या वर्षी दीड हजार रुपयांपर्यंत असणारे टॅंकरचे दर यंदा १८०० ते दोन हजार रुपयांपर्यंत पोचल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

महापालिकेकडून पाणीपुरवठा नसल्याने टंचाई
पिंपरी - नवीन विकसित झालेल्या परिसराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सोसायट्यांना सर्वाधिक टंचाई सहन करावी लागत आहे. त्यामुळे टॅंकरचा व्यवसाय तेजीत आला आहे. दरवर्षी उद्‌भवणाऱ्या या समस्येमुळे सोसायटीधारक हैराण झाले आहेत. गेल्या वर्षी दीड हजार रुपयांपर्यंत असणारे टॅंकरचे दर यंदा १८०० ते दोन हजार रुपयांपर्यंत पोचल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाकड, रावेत, मोशी, स्पाईन रस्ता अशा चारही दिशेने शहराचा विकास झाला आहे. टोलेजंग सोसायट्या, बहुमजली इमारतींमुळे लोकसंख्याही तेवढ्याच पटीने वाढली आहे. स्वाभाविकच येथील पाण्याची गरजही अन्य परिसरांच्या तुलनेत मोठी आहे. मात्र, महापालिकेच्या योग्य नियोजनाअभावी बहुतांश सोसायट्यांत पाणीच नाही. एकीकडे महापालिका पवना धरणातील पाणीसाठा घटत असल्याचे सांगते. दुसरीकडे नवविकसित परिसरांना पाणीपुरवठा करताना महापालिका आखडता हात घेत असल्याचा सोसायट्यांचा आरोप आहे. त्यामुळे दोघांच्या भांडणात टॅंकर चालक व मालकांचा लाभ होत आहे. खासगी विहिरींच्या बळावर स्थानिकांनीच टॅंकरने पाणीपुरवठ्याचा व्यवसाय सुरू केला आहे. वाकड परिसरात विंधन विहिरींसह एकूण ३० विहिरी आहेत. 

या प्रत्येक विहिरीचे स्वतंत्र पाणीपुरवठाधारक आहेत. एका पुरवठाधारकाकडून २० ते २५ सोसायट्यांना पाणी दिले जाते. विहिरींचे पाणी मुख्यता वापरण्यासाठी दिले जाते. त्याचे दर ४५० ते बाराशे रुपयांपर्यंत आहेत. पिण्याच्या पाण्याचे दर १८०० रुपयांपर्यंत आहेत. या प्रमाणेच पिंपळे सौदागर परिसरातही ८० टक्के सोसायट्या टॅंकरवरच अवलंबून आहेत. येथील टॅंकरचे दरही सातशे ते हजार रुपयांदरम्यान असून, पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा दोन हजार रुपये आकारले जातात. 

यंदा धरणात पाणीसाठा अधिक
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पवना धरणामध्ये ५- ६ टक्‍क्‍यांनी पाणीसाठा अधिक आहे. त्यामध्ये दर महिन्याला सरासरी ९ ते १० टक्‍क्‍यांनी घट होते. मात्र, अद्याप पाणी कपातीचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. पाणी कपातीचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती सहशहर अभियंता (पाणीपुरवठा) रवींद्र दुधेकर यांनी दिली.

पाणी बचतीसाठी आज मार्गदर्शन
पाणी बचत कशी करावी व त्यातून टॅंकरचे प्रमाण कशाप्रकारे कमी करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी लायन्स क्‍लब ऑफ पुणे वाकडतर्फे रविवारी (ता. २३) कार्यशाळा आयोजित केली आहे. वाकडमधील कॅप्रिशिओ सोसायटी सभागृहात सकाळी दहा वाजता होणाऱ्या या कार्यशाळेत शहरातील सर्व टंचाईग्रस्त सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन क्‍लबचे किरण वडगमा यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water tanker for society