esakal | पुणे महापालिकेत निकषांना फाटा देत पाण्याच्या निविदा
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे महापालिकेत निकषांना फाटा देत पाण्याच्या निविदा

पुणे महापालिकेत निकषांना फाटा देत पाण्याच्या निविदा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) पाणी पुरवठा (Water Supply) विभागाच्या ३८ कोटी रुपयांच्या तीन निविदा (Tender) प्रक्रियेतील गुंतागुंत वाढत चालली आहे. याच कामांसाठी तीन वर्षांपूर्वी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनच्या (सीव्हीसी) अटी-शर्तीनुसार निविदा प्रक्रिया राबविली होती. आता मात्र तेच जलशुद्धीकरण केंद्र आणि कामही तेच; मात्र निविदेत ‘सीव्हीसी’च्या निकषांना फाटा देऊन जलसंपदा विभागाच्या निकषांचा आधार घेऊन निविदा प्रक्रिया राबविल्याचे उघडकीस आले आहे. नागपूर येथील एका ठेकेदार कंपनीला हे काम मिळावे, यासाठीच हा उद्योग करण्यात आल्याचे समजते. (Water Tenders in Pune Municipal Corporation Breaking the Norms)

खडकवासला रॉ वॉटर पंपिग स्टेशन, वारजे आणि वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील विविध कामांसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्याने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या तीन कामांच्या सुमारे ३८ कोटी रुपयांच्या निविदा मर्जीतील ठेकेदाराला मिळाव्यात, यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी घोळ घातल्याचे प्रकरण ‘सकाळ’ने उघडकीस आणले आहे. त्यांचे पडसाद आज महापालिकेत उमटले. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी याच कामांच्या निविदा महापालिकेने काढल्या होत्या. त्या निविदांच्या अटी-शर्तींचे पत्र ‘सकाळ’च्या हाती लागले आहे. त्या वेळी काढलेल्या निविदा या सीव्हीसीच्या निकषानुसार काढल्या होत्या. मात्र, तेच काम आणि त्याच जलशुद्धीकरण केंद्रांच्या कामांसाठी आता काढलेल्या निविदेच्या अटी-शर्तींमध्ये सीव्हिसीच्या नियमांना फाटा देऊन जलसंपदा विभागाचे निकष वापरल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: पुणे शहरात पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा

विशेष म्हणजे या तीनही कामांसाठीची निविदा प्रक्रिया पाणी पुरवठा खात्याने जानेवारी महिन्यातच सुरू केली. त्यावेळी प्रशासनाकडून या कामांसाठी निविदेतील ज्या अटी-शर्ती ठरविल्या होत्या, त्या अटी -शर्तींवर निविदा मागविण्यापूर्वीच चार कंपन्यांनी लेखी आक्षेप घेतले होते. या कंपन्यांनी लेखी पत्रव्यवहार करून महापालिका आयुक्त आणि पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये पाणी पुरवठा विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ अभियंत्यांपर्यंत अनेक जण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

काय दिली कारणे

वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील कामासाठी तीन वर्षांपूर्वी काढलेली निविदा १३ कोटी २७ लाख रुपयांची होती. आता याच कामासाठी १७ कोटी ७२ लाख रुपयांची निविदा काढली आहे. लेबर वेतनवाढ आणि देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात वाढ झाल्याचे कारण देण्यात आले आहे.

खडकवासला रॉ वॉटर पंपिग स्टेशनची निविदा तीन वर्षांपूर्वी ८ कोटी ३५ लाख रुपयांची होती. त्याच कामासाठी आज काढलेली निविदा ९ कोटी ४१ लाख रुपयांनी वाढली आहे. येथे मात्र लेबर वेतनात वाढ झाली, एवढेच कारण दाखविले आहे. मात्र, येथील देखभाल-दुरुस्तीत वाढ झाली कशी नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हेही वाचा: पुण्याच्या मैथिलीची हार्वर्डमध्ये निवड

अनुभव असलेल्यांना बाद करण्यासाठी

तीन वर्षांपूर्वी काढलेल्या निविदेतील अटी-शर्ती कायम ठेवल्या असत्या तर निविदा प्रक्रियेत पुरेशी स्पर्धा झाली असती. परंतु, ती नको होती म्हणूनच त्यामध्ये सोयीनुसार बदल करण्यात आला. त्यामुळे यापूर्वी खडकवासला, वारजे आणि वडगाव जलशुद्धीकरण केंद्र चालविण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांना बाद करणे प्रशासनाला शक्य झाल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून समोर आले आहे. नागपूर येथील एका बड्या नेत्यांचे नाव सांगणाऱ्या कंपनीला हे काम मिळावे, यासाठी प्रशासनातील अधिकारी आणि कोरेगाव पार्क येथील एक ‘माननीय’ प्रयत्न करीत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

loading image