पुलाला छिद्रे पाडून पाणीचोरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

यवत - यवत (ता. दौंड) येथे कालव्याच्या पुलाला छिद्रे पाडून त्यातून आलेल्या पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे यवतला नवा मुठा उजवा कालवा व बेबी कालव्याच्या ५४ नंबरच्या वितरिकेचा वापर मागील वीस वर्षांपासून बंद आहे. मागील वर्षी ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर पुलाला पाडलेली  छिद्रे बुजविण्यात आली होती. मात्र, संबंधित शेतकऱ्यांनी पुलाला पुन्हा  छिद्रे पाडून पाणीचोरी सुरू केली आहे.

यवत स्टेशन परिसरात नवा मुठा उजवा कालवा ओढ्याला छेदून जातो. येथे एक मोठा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या एका कोपऱ्याला पहारीने तीन चार  छिद्रे पाडून पाणीगळती केली जाते. त्यामुळे हा ओढा खळखळून वाहत आहे. याच ओढ्याला ५४ क्रमांकाची वितरिका समांतर गेली आहे. ओढ्याचे पाणी फुकटात उपलब्ध होत असल्याने या वितरिकेवर अवलंबून असलेले शेतकरी पाणी मागणी नोंदवतच नाहीत. मागणी नसल्याने पाटबंधारे विभागाचेही या वितरिकेकडे दुर्लक्ष झालेले आहे. तीन ते चार किलोमीटर लांबीची ही वितरिका अनेक ठिकाणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या वितरिकेवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी ओढ्यावर तीन-चार ठिकाणी बंधारे तयार करून समांतर जलसिंचन योजना तयार केली आहे. पाटबंधारे विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.

या वितरिकेची थकीत पाणीपट्टी सुमारे साडेतीन लाख रुपये आहे. ती भरण्यासही शेतकरी तयार नाहीत. पाणीपट्टी न भरता, पाणी मागणी न नोंदवता या शेतकऱ्यांना फुकटात मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने ते पाटबंधारेच्या वसुलीला भीक घालत नाहीत. अनेक धनदांडग्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या वितरिकेवर अवलंबून आहेत. नवा मुठा उजवा कालव्याचे आवर्तन बंद झाल्यास बेबी कालव्यावर पाइप टाकून या ओढ्यात पाणी सोडले जाते. त्यामुळे या भागात पाणीपट्टी भरली नाही, तरी पाण्याची कमतरता कधी पडत नाही.

...तर वितरिका पूर्ववत करू
या वितरिकेवरील पाणीपट्टीची थकबाकी भरून शेतकऱ्यांनी पाणी मागणी नोंदविल्यास वितरिका पूर्ववत करण्याची आमची तयारी आहे, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. यासाठी सुमारे पन्नास हजार रुपये खर्च करून बेबी कालव्यावर पाणी वितरणाची व्यवस्था (चिमणी) करण्यात आल्याचेही सांगितले.

Web Title: water theft crime